आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम:शिंदखेडा टपाल कार्यालयात जनरेटर धूळखात पडून; कामकाजावर परिणाम

शिंदखेडा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही ग्राहकांना अखंडित सेवा मिळावी यासाठी टपाल कार्यालयात जनरेटर आहे. पण दहा वर्षे होऊनही जनरेटर कार्यान्वित झालेले नाही. आता या जनरेटरची दुरवस्था झाली आहे. त्याचे सर्व भाग वेगवेगळे झाले आणि पूर्णतः सडले आहे. शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून घेतलेले हे जनरेटर ग्राहक व कर्मचाऱ्यांना उपयोगी पडले नाही या जनरेटरच्या नुकसानीकडे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली. परिणामतः शासनाचे लाखो रुपये वाया गेले असून, यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनरेटर कार्यान्वित करून ग्राहकांची होणारी अडचण दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात बुराई नदीच्या किनारी असलेल्या मशीद परिसरात टपाल कार्यालय आहे. गेल्या तीस वर्षांपासून टपाल कार्यालय भाडेतत्त्वावरील खोलीत आहे. यापूर्वी शहराचा मर्यादित विकास असल्याने टपाल कार्यालयाशी नागरिकांचा फारसा संपर्क येत नव्हता; परंतु गेल्या काही वर्षांपासून ग्राहक संख्या वाढली आहे.

त्यामुळे कार्यालय हायटेक करणे गरजेचे होते. टपाल कार्यालयात अनेक काम संगणकाच्या सहाय्याने सुरू झाल्याने ग्राहकांना तत्काळ सेवा मिळणे सुलभ झाले आहे. येथील टपाल कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयाला जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे जनरेटर आणून दहा वर्षे झाली तरी तरी ते कार्यान्वित झालेले नाही. सद्य:स्थितीत हे जनरेटर इमारतीच्या बाहेर धूळखात पडले आहे.

खालच्या बाजूचा पत्रा पूर्णतः खराब झाला आहे. जनरेटर कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक पोस्ट मास्तर अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका टपाल कार्यालयाला बसतो आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर सर्व संगणक बंद होतात. ग्राहकांना थांबावे लागते. दुसरीकडे शासनाने लाखो रुपये खर्च करून जनरेटर उपलब्ध करून दिलेले असले तरी याचा फायदा होत नाही.

ग्राहक, कर्मचाऱ्यांमध्ये वाद
वीजपुरवठा खंडित झाल्यावर काम वेळेवर होत नसल्याने काही वेळेला ग्राहक कर्मचारी व पोस्ट मास्तरामध्ये वाद होतात. गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध झालेले जनरेटर सुरू का केले नाही, त्यास जबाबदार कोण याची चौकशी करण्याची गरज आहे. तसेच टपाल कार्यालयात इन्व्हर्टर बसवावे अशी मागणी होते आहे.

बातम्या आणखी आहेत...