आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना जगण्याचे धडे:जीवन शाळेत आदिवासी मुलांना जगण्याचे धडे देणारे ध्येयवेडे मांगू गुरुजी

रणजित राजपूत | नंदुरबार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या वतीने नर्मदा काठावर चालवण्यात येणाऱ्या थूवानी, ता.अक्राणी येथील शिक्षक मांगू फोगल्या पावरा हे गेल्या १३ वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठीच धडपड करत आहेत. साडे सहा हजारांचे अल्पसे मानधन घेऊन आदिवासींच्या मुलांसाठी धडपडणारे मांगू गुरूजी त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.

नर्मदा काठावर सुख सुविधांचा अभाव असतानाही मांगू गुरुजी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करत आहेत. आदिवासी संस्कृतीचे जतन तसेच पुस्तकासोबतच ते शेतीचेही ज्ञान देत असल्याने त्यांची ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ अशी ओळख निर्माण झाली आहे. चुलवड येथे राहणाऱ्या शिक्षक मांगू पावरा यांनी बी.एड.चे शिक्षण घेतले. त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांची प्रेरणा घेत त्यांनी या आंदोलनाच्या नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या थूवाणी शाळेत शिक्षकी पेशाचे व्रत हाती घेतले. गेल्या १३ वर्षांपासून ते इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. सर्वच विषय ते शिकवतात.

नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या वतीने नर्मदा काठावर सात शाळा चालवण्यात येतात. “लढाई पढाई एक साथ’ हे ब्रीद घेऊन शिक्षक या शाळेत शिकवत असतात. बाल मेळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव दिला जातो. बाल मेळाव्यात सिने दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतात. मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत दर वर्षी बाल महोत्सव घेतला जातो. शासनाकडून मदत न घेता दानशूर व्यक्तींच्या निधीतून चालणाऱ्या या शाळेत शिक्षक तन-मन-धनाने काम करतात हे विशेष.

ज्या जातीत जन्मलाे तेथील मुलांना शिकवण्याचे भाग्य
^मला पगार कमी आहे, असे मी कधीच म्हणत नाही. उलट ज्या जातीत जन्माला आलो, त्या मुलांना शिकवण्याचे भाग्य मला मिळाले, यात मला अतिशय समाधान आहे. मुलांना जीवनात उपयाेगी पडेल, असे ज्ञान देण्याचा माझा प्रयत्न अाहे.मांगू फोगल्या पावरा, शिक्षक, जीवन शाळा, थुवानी.

मुलांना प्रात्यक्षिकासह देतात शेती करण्याचेही ज्ञान
मुलांना शेती करता यावी, यासाठी मांगू पावरा गुरुजी त्यांना प्रत्यक्ष शेतावर नेतात. तसेच पेरणी कशी करतात ते प्रात्यक्षिकासह शिकवतात. मुलांना मराठी भाषा येत नसल्याने त्यांच्या कलेने आदिवासी भाषेसोबतच मराठी भाषा शिकवतात. आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी ते आदिवासींच्या संस्कृतीबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अभिमान निर्माण होईल, या पद्धतीने ते शिकवतात. एवढेच नाही तर औषधी वनस्पती, जडीबुटी याचेही पाठ ते गिरवतात.

बातम्या आणखी आहेत...