आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे लाभार्थी ठरवण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी तोंडी सूचनेने जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना दिले आहे. सिंचन विहिरी व गायगोठ्याचे प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार लोकसंख्येनुसार ग्रामसभेला असून, या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. त्यामुळे या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. याविषयी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना प्रत्येकी २० विहिरी व १० गाय गोठे मंजुरीचे तोंडी अधिकार दिले आहे. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची सही व शिक्का असलेले अर्ज वाटप होत आहे.
तसेच विहिरी व गोठे मंजूर करताना आर्थिक देवाण घेवाण होते आहे. या प्रकारामुळे अल्पभूधारक व अनुसूचित जाती-जमाती, आर्थिक दुर्बल, दिव्यांग, भटक्या व विमुक्त जमातीसाठी राबवण्यात येणाऱ्या सिंचन विहीर योजनेची बदनामी होणार आहे. योजना मंजूर करण्याचा अधिकार लोकसंख्येच्या निकषानुसार ग्रामसभेला आहे. ग्रामपंचायत आलेल्या अर्जांची छाननी करून ग्रामसभेत लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून ठराव पंचायत समितीकडे पाठवते. त्यामुळे प्रचलित पद्धतीनुसार सिंचन विहीर व गायगाेठ्यांचे वाटप करावे, अशी मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती कैलास पाटील यांनी केली आहे. याविषयाकडे लक्ष दिले नाही तर आंदाेलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याविषयाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याविषयाकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.