आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाब्दिक वाद:आजी-माजी कृषी सभापतीत जुंपली; अंगावर धावून जाण्याचा केला प्रयत्न

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खत विक्रीच्या मुद्द्यावरून कृषी सभापती संग्राम पाटील आणि माजी कृषी सभापती तथा सदस्य किरण पाटील यांच्यात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शाब्दिक वाद झाले. आजी-माजी सभापतींनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. तसेच असंसदीय भाषा वापरली. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. या वेळी आजी-माजी सभापती एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वेळी अन्य सदस्यांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला.

जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी ही सभा झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, उपाध्यक्षा कुसुम निकम, आरोग्य व शिक्षण सभापती मंगला पाटील, महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे, समाज कल्याण सभापती मोगरा पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे उपस्थित होते. आयत्या वेळेच्या विषयावर माजी कृषी सभापती किरण पाटील यांनी कृषी सभापती संग्राम पाटील यांना खतांच्या लिंकिंग विषयी प्रश्न विचारला. या वेळी कृषी सभापती संग्राम पाटील यांनी अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सांगितले.

त्यावर किरण पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांना तुम्ही खाली बसा असे सांगितले. त्यावर कृषी सभापती पाटील म्हणाले की, तुम्ही दबाव टाकू शकत नाही. अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास सांगितले असताना त्यांना खाली बसा असे तुम्ही सांगू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरून आजी-माजी सभापतींमध्ये शाब्दिक वाद झाला. आजी-माजी सभापती एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी जागेवरून उठले. या वेळी ललित वारुडे, हर्षवर्धन दहिते, पाेपटराव साेनवणे आदींनी दाेघांची समजूत काढत त्यांना रोखले.

निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन
कापडणे गटातील काही रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याने ती थांबवावी अशी मागणी झाली. संबंधित अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवावे किंवा निलंबित करा, अशी मागणी किरण पाटील यांनी केली. बांधकाम विभागाने चौकशी करावी, अशी सूचना अध्यक्ष तुषार रंधे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...