आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणींचा डोंगर:धडगाव तालुक्यातील निम्मे गाव, पाडे अंधारात; वीज बिल वसुली होत नसल्याचा विपरीत परिणाम

धडगाव2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अनेक ग्राहकांवर लाखोंची थकबाकी असल्याने अनेक गावे व पाड्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वेळोवेळी नोटीस देऊन व सांगूनही थकबाकी भरणा केला जात नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुके अतिदुर्गम भागात असून येथे सर्वात मोठी समस्या म्हणजे अद्याप मोबाइल सेवा पोहाेचलेली नाही. तालुक्यात सुमारे १५०० पाडे आहेत. तर १५० गावे सुमारे १५० ते २०० कि.मी. डोंगराळ भागात असून, तेथे जाण्यासाठी रस्ते नाही.

सर्वच कामांना फटका
वीज बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने अनेक गावातील नागरिकांनी गुजरात, मध्य प्रदेश राज्यांत रोजगारासाठी स्थलांतर केल्याने गावे ओस पडली आहेत. त्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे तहसील, वीज महावितरण, पंचायत समिती, पोलिस ठाणे कार्यालयांसह सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, कृषी विभागासह ऑनलाइन कामकाज, खरेदी-विक्री अशी सर्व कामे बंद पडली आहेत. सर्वात जास्त फटका महावितरण कंपनीला बसला आहे. त्यांची सर्वच कामे ऑनलाइन झाल्याने माेठे नुकसान हाेत आहे. वीज बिल भरणा, वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित किंवा कायमस्वरूपी बंद करणे, ऑनलाइन रीडिंग फीड करणे अशा सर्व कामांना अडचणी येत आहे.

ब्रॉडबँड सेवा बंदमुळे त्रासात भर
तालुक्यातील काकर्दा, माडवी, सिसा, चुलवड, बिलगाव, खामला, उमराणी, चुलवड, त्रिशूल, बिलगाव, माळ, राजबर्डी, असली येथील नागरिक वीज बिल भरण्यासाठी, आर्थिक व्यवहारासाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात. मात्र बीएसएनएल ब्राॅडबँड सेवा बंद असल्याचे सांगितले जाते. परिणामी नागरिकांची गैरसोय होते. विविध योजनांची माहिती, नावनोदणी व मानधन घेण्यासाठी धडगाव येथे यावे लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. तर विजेचा एखादा फाॅल्ट झाला तर तो शोधण्यासाठी किमान ८-१० तास लागतात. कारण येण्या-जाण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यात मोबाइलसाठी रेंज मिळत नसल्याने महावितरण कार्यालयाशी संपर्क होत नाही.

ग्राहक परराज्यात; बिल वसुलीस अडचण
तालुक्यातील अनेक ग्राहकांनी आपले वीज बिल भरणा केलेला नाही. वारंवार सांगूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक गावे व पाड्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. रोजगारासाठी अनेक कुटुंबे परराज्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांची घरे बंद असल्याने वसुलीसाठी मोठी अडचण येत आहे. ग्राहकांनी कंपनीला सहकार्य करावे.
- जगदीश पावरा, सहायक अभियंता, धडगाव.

पावसाळ्यात अतिदुर्गम भागातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करा
अक्कलकुवा

पावसाळ्यामुळे सुरळीत वीजपुरवठा होणे गरजेचे असून तालुक्यातील गावांमधील विस्कळीत वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी भाजप अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. वीज महावितरण कंपनीचे येथील उपकार्यकारी अभियंता यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. अक्कलकुवा तालुक्यातील वेलखेडी, सांबर, डेब्रामाळ, पलासखोब्रा या गावांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. मात्र तरीही तेथील वीजपुरवठा नेहमी बंदस्थितीत असतो. तसेच मोलगीचा बोथवापाडा व बालाघाटचा कोठलीपाडा येथे वीजपुरवठा सुरळीत होत नाही. मोलगी परिसरातही वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. पावसाळा सुरू झाला असून मोलगी परिसरातील गाव पाड्यांवर रात्रीच्या वेळी सर्पदंश होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी अखंडित वीजपुरवठा करावा, असे नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...