आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पोळ्याचा उत्साह, साहित्य महागले तरीही खरेदी; पाऊस चांगला झाल्याने शेतकरी आनंदात

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला बाजारात पूजेसाठी मातीचे बैल ठिकठिकाणी विक्रीस आले होते. दुसरीकडे सर्जा-राजाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची पावले बाजारात वळली होती. दोन वर्ष पोळ्यावर कोरोनाचे सावट होते. यंदा तशी स्थिती नाही. तसेच पाऊसही समाधानकारक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. शेतकऱ्यांनी बैलांसाठी नवीन झूल, मोरके, घंटी, पैंजण, कवडी माळ, आरसे आदी सजावटीचे साहित्य घेतले. साहित्याच्या किंमतीत २० टक्के वाढ झाली असली तरी साहित्याला मागणी चांगली होती.

कोरोनामुळे २०२० व २०२१ मध्ये निर्बंध होते. त्यामुळे नागरिकांमध्ये निराशा होती. या काळात पोळ्यासह अन्य सण सार्वजनिकरीत्या उत्साहात साजरे झाले नाही. यंदा चित्र बदलले आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले आहे. त्याचबरोबर जिल्हाभरात पाऊसही चांगला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पोळ्याचा प्रचंड उत्साह दिसून येतो आहे. बाजारात गुरुवारी लाडक्या बैलांना सजवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीसाठी हजेरी लावली होती. घरगुती पूजेसाठी लागणाऱ्या मातीच्या बैलांना चांगली मागणी होती. गेल्यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने बाजारात सजावटीच्या साहित्याचा प्रचंड तुटवडा होता. त्यामुळे वस्तूंच्या किमती ५० ते ६० टक्के वाढल्या होत्या. यंदा त्या तुलनेत वस्तूंच्या किमती आवाक्यात आहे. यावर्षी शहरात जळगाव, अहमदनगर येथून पुरेशा प्रमाणात सजावटीचे साहित्य आले असल्याचे चित्र आहे.

यांत्रिकीकरण झाले तरी महत्त्व कायम
पूर्वी एकापेक्षा अधिक बैलजोडी पाळणे ग्रामीण भागात प्रतिष्ठा आणि श्रीमंतीचे प्रतिक होते. आता बैलजोडी ऐवजी यांत्रिक साधनांचा वापर शेतीसाठी वाढला आहे. त्यानंतरही कोळपणी व इतर कामांसाठी बैलजोडी गरज असते. त्यामुळे बैल व पोळा सणाचे महत्त्व कायम आहे. ग्रामीण भागासह शहरात उद्या शुक्रवारी दुपारनंतर मिरवणुका काढण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. शिरपूर, साक्री, शिंदखेडा येथील बाजारातही खरेदीसाठी गर्दी झाली होती.

३० रुपयांपासून वस्तू विक्रीस
बाजारात वेसण (नाथ) ४० ते ३० रुपये जोडी, दोर १०० ते १२० रुपये जोडी, मढाढी ३५ ते ४० रुपये जोडी, म्होरके ६०, ८०, १०० रुपये जोडी, केसाळ पैंजण ३० ते ५० रुपये जोडी, कवडी माळ १०० रुपये जोडी, रंगाची माळ २० ते १०० रुपये जोडी, पैंजण ६० ते २०० रुपये जोडी, रंग ५० ग्रॅम ३० रुपये, घंटी १२० ते ३६० रुपये या दराने विक्रीस आले होते.

बातम्या आणखी आहेत...