आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातृतीयपंथीयांच्या रहिवासासाठी जमीन मागणीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून सादर करावा. त्यावर महसूल विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच तृतीय पंथीयांवर उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयासह सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात यावे अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली. जिल्ह्यातील तृतीय पंथीयांच्या समस्या, तक्रारी संदर्भात जिल्हास्तरावर गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, जिल्हा परिविक्षा अधिकारी एम. एम. बागुल, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, अशासकीय सदस्य पार्वती जोगी, सचिन शेवतकर, ॲड. विनोद बोरसे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, केंद्र सरकारने तृतीयपंथीय व्यक्तींसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.
या पोर्टलवर सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी नाव नोंदणी करावी. नोंदणीच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे अभिप्रेत आहे. त्यासाठी समाजकल्याण विभाग व तृतीयपंथीयांनी प्रयत्न करावे. तृतीयपंथीय व्यक्तींच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालय आणि श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा. तेथे तृतीयपंथीय व्यक्ती दाखल झाल्यावर त्याच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात यावे. त्यांच्यासाठी नागरी व ग्रामीण भागात स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधावीत. किमान कौशल्य विकास कार्यक्रमातून शेळीपालनासाठी तृतीयपंथीयांनी अनुकूलता दर्शविली आहे.
त्यामुळे सबंधितांना तातडीने प्रशिक्षण द्यावे. याशिवाय बाह्यस्त्रोतांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांनी तृतीयपंथीय व्यक्तींना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी केली. पार्वती जोगी, शेवतकर, ॲड. बोरसे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त बडगुजर यांनी प्रास्ताविक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.