आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:साक्रीसाठी विकास निधी दिल्याने आ.मंजुळा गावित शिंदेंच्या गोटात; महाविकास आघाडीतील शिवसेनेला दिला होता पाठिंबा

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या तीसहून जास्त आमदारांसह सुरतला गेले आहे. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावितही मंत्री शिंदे यांच्या गोटात गेल्याचे वृत्त आहे. मंत्री शिंदे यांच्या माध्यमातून आमदार गावित यांनी साक्रीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळेच आमदार गावित त्यांच्या गोटात गेल्याची माहिती मिळते आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवला होता. त्यामुळे आमदार मंजुळा गावित मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मंगळवारी दुपारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाइल बंद होता. तसेच त्यांचे पती तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांचाही मोबाइल बंद होता. त्यानंतर रात्री उशिरा आमदार मंजुळा गावितही मंत्री शिंदे यांच्या गोटात गेल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आमदार मंजुळा गावित यांच्या शहरातील निवासस्थानीही कोणीही नव्हते. तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार गावित मुंबईत असल्याचे सांगितले. तसेच मोबाइलवर कोणीही संपर्क करू नये अशा सूचना दिल्याचेही सांगण्यात आले.

शिवसेना कार्यालयातही शांतता : शहरातील झाशी राणी पुतळा चौकात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. कार्यालयात मंगळवारी दिवसभर शांतता होती. कार्यालयाकडे पदाधिकारी, कार्यकर्ता फिरकले नाही. त्यामुळे शुकशुकाट होता.

या कामांसाठी मिळवला निधी
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार मंजुळा गावित यांनी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधा युक्त रुग्णवाहिका मिळवली आहे. याशिवाय रस्त्यांची कामे मार्गी लावली आहे. साक्री शहराची ३४ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली होती; परंतु नगरपंचायतीत भाजपची सत्ता आल्याने ही योजना रद्द करण्यात आली. त्याचबरोबर धुळे शहरासाठीदेखील २४ कोटींची तरतूद मंत्री शिंदे यांच्यामार्फत आमदार गावित यांनी करून घेतली आहे.

राज्यात लवकरच परिवर्तन दिसेल
राज्यातील तिघाडी सरकारला जनता कंटाळली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या मनातील असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. लवकरच राज्यातील जनतेला परिवर्तन झाल्याचे दिसेल. - डॉ.सुभाष भामरे, खासदार