आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशोत्सव:पहिल्याच दिवशी अभ्यासाऐवजी, गप्पागोष्टी अन् हितगुजावरच भर; विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुगे आणि रंगीत पताकांनी सजवलेल्या शाळेत पहिल्याच दिवशी पाऊल ठेवताच गुलाब पुष्पाने स्वागत आणि पेढे भरून तोंड गोड झाले. तरीही शाळेच्या पहिल्या दिवसाच्या अनामिक भितीने नवप्रवेशितांना रडू कोसळले. म्हणूनच मुलांच्या भावनांना साद घालत शाळांनी पहिल्या दिवशी अभ्यासाऐवजी मुलांशी हितगुज, गप्पागोष्टी करीत त्यांच्यातील भिती दूर केली. कोरोनाच्या संकटामुळे तब्बल दोन वर्षानंतर जल्लोषात शाळा सुरु झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले, जिल्ह्यातील २०५ वगळता सर्व शाळांना गणवेश निधी मे महिन्यात वितरीत करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे गणवेशाचे कापड खरेदी पासून तर शिलाईपर्यंतचे काम शक्य झाले नसल्याने मोजक्याच शाळा गणवेश देऊ शकल्या. तर बहुतांश शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले नाहीत. तर विद्यार्थ्यांसाठी पहिला दिवस स्मरणीय रहावा या करीता विविध उपक्रम राबवण्यात आले.

१००% शाळा झाल्या सुरू
शाळा शुभारंभाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा सुरु झाल्या. त्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या १ हजार १३९, खासगी अनुदानित प्राथमिक १३८, खासगी विना अनुदानित १३४ अशा एकूण १ हजार ४११ प्राथमिक शाळा, जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित २१२ माध्यमिक शाळा, ७३ विना अनुदानित माध्यमिक अशा १८६ माध्यमिक शाळा सुरू झाल्या.

ग्रामीण भागातील मुलांचा खासगी वाहनातून प्रवास
पहिल्या दिवशी धुळे तालुक्यातील वडजाई, सौंदाणे, बाभुळवाडी, नगाव, कापडणे, देवभाने, धमाणे, गोंदुर, निमडाळे, मेहरगाव, कुसुंबा, कुसुंबा,गरताड, खेडे, कुंडाणे-वरखेडी, कुंडाणे-वार, लळींग,नगाव, चिंचगाव, फागणे,बाळापुर, अजंग, मुकटी आदि गावातील विद्यार्थ्यांची वाहतुक करणारे वाहने शहरातील शाळांमध्ये दोन वर्षा नंतर दाखल झाले. विद्यार्थी वाहतुक करणारे वाहनधारक त्याच गावातील रहिवासी असल्यामुळे पालक देखील त्यांच्या वाहनातून मुलांना पाठवत आहेत.

अधिकाऱ्यांनीही भेटी देत साधला संवाद
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी साक्री तालुक्यातील सैय्यदनगर आणि शेवाळी येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. समवेत शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, महिला आणि बालकल्याण अधिकारी हेमंतकुमार भदाणे, गटविकास अधिकारी वाघ, गटशिक्षणाधिकारी पगारे उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेशाचे वितरण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी, धमाणे शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.धमाणे येथील शाळेत शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.

बातम्या आणखी आहेत...