आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानाचा तुरा:पुरवठा शाखा, शासकीय गोदाम, दोन रेशन दुकानांना आयएसओ; शिरपूर तालुक्याची कामगिरी

शिरपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा, खर्दे येथील शासकीय गोदाम, होळ आणि करवंद येथील रेशन दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले. नाशिक महसूल विभागात आयएसओ मानांकन मिळवणारे शिरपूर हे पहिलेच तहसील कार्यालय ठरले आहे. येथील तहसीलदार आबा महाजन यांनी पुरवठा शाखेचे कामकाज सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित केले हाेते. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना अति महत्त्वाची कागदपत्रे अद्ययावत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महत्त्वाची कागदपत्र सुरक्षितरीत्या ठेवण्यात आली.

तहसील कार्यालयाच्या इमारतीला फक्त रंगरंगोटी न करता तहसीलदार महाजन यांनी कार्यालयातील दैनंदिन कारभार सुधारला. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामाची शिस्त लावली. परिणामी तालुक्यातील सामान्य लोकांच्या कामाचा निपटारा वेळेत होण्यास मदत झाली. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना महत्त्वाची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले. दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. तालुक्यातील दोनशेपेक्षा जास्त रेशन दुकानदार मालकांच्या मासिक बैठका घेऊन त्यांना रेशन ग्राहकांशी सौजन्याने वागण्याची सूचना केली. त्यामुळे पुरवठा विभागाला आयएसओ मानांकन मिळाले.

तसेच खर्दे येथील शासकीय गोदामात विविध उपाययोजना करण्यात आल्याने या गोदामालाही आयएसओ मानांकन मिळाले. या गोदामात सन १९९० ते २०२० पर्यंतच्या सर्व त्रुटी पूर्ण करण्यात आल्या. नाशिक विभागात अशा प्रकारचे सर्व त्रुटी पूर्ण करणारा शिरपूर हा एकमेव तालुका आहे. गोदामात काम करणाऱ्या ३० हमालांना गणवेश देण्यात आले. याठिकाणी पारदर्शक व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली. गोदाम पाल अमोल जगताप यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या मदतीने लोकसहभागातून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आयएसओ मानांकन मिळावे यासाठी पुरवठा विभागातील प्राजक्ता सोमलकर, बी.ए. बोरसे, अपर्णा वडुलकर, विद्या साळवे आदींनी प्रयत्न केले.

रेशन दुकानदारांचा दौरा : करवंद आणि होळ येथील रेशन दुकानांनाही आयएसओ नामांकन मिळाले. रेशन दुकान कशा पद्धतीने चालवावे यासाठी तालुक्यातील रेशन दुकानदारांचा पुणे जिल्ह्यात विशेष अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच रेशन दुकानदार आता ग्राहकांना चांगल्या सुविधा देत आहे.

सर्वांच्या प्रयत्नामुळे शिरपूरला मिळाला बहुमान
कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे तहसील कार्यालयाचा चेहरामोहरा बदलता आला. त्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे नाशिक विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला.
आबा महाजन, तहसीलदार शिरपूर

बातम्या आणखी आहेत...