आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:समाजात श्रेष्ठत्व मिळवणे सोपे पण आदर्श होणे कठीण; व्यक्तीपेक्षा कार्यपूजक व्हावे, प्रा. प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. जोशी यांचा शहरात माजी विद्यार्थ्यांतर्फे नागरी सत्कार, स्मरणिका प्रकाशन

समाज किंवा कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठत्व मिळवणे सोपे असते. पण आदर्श होणे कठीण असते. समाजात चांगुलपणाचे प्रमाण कमी होते आहे. पण या परिस्थितीतही शिक्षक कुणासमोरही झुकत नाही. त्यामुळे व्यक्तीपेक्षा गुण, कार्यपूजक होणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले.

शहरातील राजर्षी शाहू नाट्यमंदिरात रविवारी डॉ.एन.एम. जोशी यांचा कार्यगौरव झाला. त्या वेळी ते बोलत होते. धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवी बेलपाठक अध्यक्षस्थानी होते. डॉ. नरेंद्र जोशी यांचा खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते सत्कार झाला. स्मरणिकेचे प्रकाशन योगेश्वर पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन गोपाळ केले यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर प्रदीप कर्पे, मनपा स्थायी समिती सभापती शीतल नवले, डॉ. जोशी नागरी गौरव समितीचे प्रमुख मदनलाल मिश्रा, विभा जोशी, धुळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव संतोष अग्रवाल, आदर्श संस्थेचे धनराज रवंदळे, अॅड. कुंदन पवार, प्रा. देवेंद्र डोंगरे, डॉ. ए.पी. जोशी, रत्नाकर रानडे, व्यंकटेश दाबके, सुभाष अग्रवाल, सीए श्रीराम देशपांडे आदी उपस्थित होते. प्रा. प्रकाश पाठक म्हणाले की, शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आड नसते. ते त्यापलीकडेही असते. शिक्षण केवळ पुस्तकात नसते तर व्यवहारातही असते. शिक्षण दृष्टी व शक्ती देण्याचे काम करते. त्यामुळे शिक्षक पेशा हा व्रतस्थ आहे. शिक्षक भावी पिढीला फक्त घडवत नाही तर ताकदीने उभे करतात. शिक्षक वाकता, मोडतात मात्र कोणासमोर झुकत नाही. हेच गुणवैशिष्ट्य जपण्याचे काम धुळे एज्युकेशन सोसायटीतील अनेक शिक्षकांनी केले आहे. संस्थेच्या १०७ वर्षांच्या इतिहासात अनेक शिक्षक आले. त्यांनी शेकडो विद्यार्थी घडवले. त्यामुळे हा कार्यक्रम व्यक्तीचा गौरव नसून, गुण व कार्याचा गौरव असल्याचे ते म्हणाले. आमदार अमरीश पटेल यांनी शुभेच्छा पाठवल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. नरेंद्र जोशी यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना डॉ. नरेंद्र जोशी यांनी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. ज्या संस्थेत शिक्षण घेतले त्याच ठिकाणी शिक्षक व मुख्याध्यापक झालो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, याचा मनस्वी आनंद आहे. माझ्यामुळे विद्यार्थी घडले किंवा नाही हे सांगणे कठीण असले तरी विद्यार्थी घडवताना स्वत: घडत गेल्याचे ते म्हणाले. मदनलाल मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दया जोशी, पंकज चौधरी यांनी केले. डॉ. नंदकिशोर बागुल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुलभा भानगावकर, विजय पाच्छापूरकर, कमलाकर जोशी, डॉ. नंदकिशोर बागुल, महेश मुळे, भरतसिंग भरोदिया, डॉ.दीपक फुलपगारे, संजय मुंदडा, नितीन ठाकूर, विजय जोशी, नीलेश खळीकर, ऋषीकेश गालफाडे, किरण पालवे, शेखर कुलकर्णी, अभिजित जोशी, शैलेश क्षत्रिय, ललित कुलकर्णी, अभिजित जोशी, दीपक घड्याळजी, अजय कोसोदेकर, अर्जुन वानखेडे, प्रशांत नेरकर, प्रशांत पालवे यांनी प्रयत्न केले.

प्रशासकीय पदाची जबाबदारी
डॉ. नरेंद्र जोशी यांनी शैक्षणिक क्षेत्रासह एनसीसीत भरीव कार्य केले. संस्थेने सोपवलेली जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली. संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांच्यावर संस्थेने प्रशासकीय प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या शिक्षकाची बदली रद्द करावी म्हणून अकरा वर्षांच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रथम पालक, विद्यार्थी आल्याचा प्रसंग घडला होता. रवी बेलपाठक, अध्यक्ष: धुळे एज्युकेशन सोसायटी

समाजासाठी प्रेरणादायी कार्य
संरक्षण राज्यमंत्री असताना एक लाख एनसीसी कॅडेट घडवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यासाठी डॉ. नरेंद्र जोशी यांच्यासारख्या अनेक शिक्षकांची साथ मिळाली. शिक्षकांमुळे समाज प्रगतिपथावर असतो. डॉ.जोशी यांच्या कार्यातून इतर शिक्षकांनी प्रेरणा घ्यावी. डॉ.सुभाष भामरे, खासदार

बातम्या आणखी आहेत...