आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

यशोगाथा:साक्री तालुक्यातील कवितेची गरुडझेप, राज्यसेवा मुख्य परीक्षेत एसटी संवर्गातून राज्यात आली पहिली; उपजिल्हाधिकारी पदी निवड

पिंपळनेर (विशाल बेनुस्कर)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविता गायकवाड, एसटी संवर्गातून मुलींमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी
Advertisement
Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल 19 जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेत पिंपळनेर शहरापासून अवघ्या 7 किमी अंतरावरील झंझाळे ता.साक्री येथील कविता विजय गायकवाड या पदवीधर तरुणीने अवघ्या 29 व्या वर्षीच हे यश संपादन केले असून थेट उपजिल्हाधिकारी पदी मजल मारली आहे. ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारता येऊ शकते, हे कविता गायकवाड या तरुणीने दाखवून दिले आहे. एसटी संवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पंचक्रोशीतील कविता पहिली उपजिल्हाधिकारी बनली आहे. कविताला लहानपणापासून अधिकारी व्हायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते अखेर ते आता पूर्ण झाले आहे. या यशाने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वीही कविता अनेक परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. कविता गायकवाड ही झंझाळे येथील कै.श्रावण रामा गायकवाड यांची नात असून कुटुंबात वडील विजय श्रावण गायकवाड, आई अंजनी विजय गायकवाड व 2 भाऊ अशी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. कविता ही यांमध्ये मोठी आहे. झंझाळे गावात यापूर्वी कविताचा मोठा भाऊ दिनेश गायकवाड हा गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेतून उत्तीर्ण झाला आहे. सध्या तो नागपूर जिल्ह्यातील काटोल नगरपरिषद येथे सहायक नगर रचनाकार राजपत्रित गट ब अधिकारी या पदावर कार्यरत आहे. तर लहान भाऊ गणेश गायकवाड हा शेती व्यवसाय बघतो.

कवितेचा शैक्षणिक प्रवास 

कविताने 1 ते 4 जि.प.शाळा या आपल्या मूळगावी झंजाळे येथून सुरू केला. इयत्ता 5 वी ते 8 वी कन्या विद्यालय समोडे, 9 वी मिशन हायस्कुल नंदुरबार, 10 वी रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय नाशिक, 11 वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण एचपीटी आर्ट्स अँड सायन्स कॉलेज नाशिक येथे घेतले आहे. 2009 मध्ये 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची ओळख कविताला कॉलेज मध्येच झाली होती. त्यानंतर नाशिकच्या मुरकुटे ग्रंथालयात 2013 मध्ये स्वतः अभ्यास (सेल्फ स्टडी) करण्यास सुरूवात केली. 2014 मध्ये नोकरी सांभाळून पुन्हा पुढचा अभ्यास अखंडपणे सुरूच ठेवला. ऑफिस कामानंतर  साधारणपणे रोज 5 तास अभ्यास होता. परंतु परीक्षेच्या आधी एक ते दीड महिने पूर्ण वेळ देऊन 12 ते 13 तास रोज अभ्यास असे नियोजन होते. कविताला अंतिम परीक्षेत 900 पैकी 457 गुण मिळाले असून ती एसटी संवर्गातून राज्यात प्रथम आली आहे. कविताचे अवघ्या 29 व्या वर्षी हे यश मिळवले आहे.

कविताचे आजोबा श्रावण गायकवाड हे नेहमी म्हणायचे, 'माझी बाई पक्की मोठी अधिकारी होईल' हेच वाक्य कविताला खुप प्रेरणा देणारे होते आणि हेच स्वप्न मनाशी बाळगले होते. त्यामुळे ध्येय गाठण्यासाठी केलेला संघर्ष सकारात्मक परिणाम निर्माण करत गेला. जे लहानपणापासूनचे स्वप्न होते ते आता प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे.

कविताने आतापर्यंत 2014 मध्ये कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन जलसंपदा विभाग येवला येथे नोकरी केली. त्यानंतर 2015 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड होऊनही रुजू झाली नाही. त्याच्या पुढच्याच वर्षी 2016 मध्ये पुन्हा विक्रीकर सहाय्यक पदी निवड झाली होती मात्र ही नोकरी देखील कविताने स्वीकारली नाही. 2017 मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली होती. येथे कविताने अडीच वर्षे नोकरी सांभाळली. असे असतांनाच 2018 मध्ये राज्यसेवेतून मुख्याधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यामुळे 2019 पासून सद्या कविता गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे. अशा अनेक जबाबदाऱ्या कविताने  पार पडल्या आहेत. तर 19 जून रोजी लागलेल्या निकालाने पुन्हा एकदा सुखद अनुभव दिला. आता कविताने गरुडझेप घेत राज्यसेवेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली.

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींकडून मला काहीतरी शिकायला मिळाले आहे म्हणून अस सर्व ज्ञात-अज्ञात माझ्यासाठी आदर्श आहेत. माझ्या यशात कुटुंबातील आजी-आजोबा, आई-वडील आणि जिने मला घडवलं ती माझी आत्या भारती भोये हिचा खुप मोठा वाटा आहे हे कविता अभिमानाने सांगते.

एरव्ही इतरांना तर साधी नोकरी मिळाली तरी ते थांबतात मात्र कविताने काही मोठया पदाच्या नोकऱ्याही नाकारल्या व मला पुढे कसे जाता येईल, सतत अभ्यास कसा करता येईल त्याच नोकरीला प्राधान्य दिले. केवळ यशाचा प्रवास गाठला यासाठी तिला कारण नको हवे होते. तर उत्तुंग झेप घेण्याची जिद्द मनाशी बांधली होती.

"जीवनात आपण आपले ध्येय निश्चित केले तर आपण परिस्थिती नक्कीच बदलू शकतो. मात्र यासाठी चांगले प्रयत्न करा. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून बघा. आपल्या अंतर्मनाला जे वाटत तेच करा. यश हमखास आहे. हाच संदेश मी ग्रामस्थांसह तरुणांना देऊ इच्छिते. पदभार स्वीकारल्यानंतर सामान्य माणसाला साहाय्य व न्याय मिळेल अशा सर्वच कामांना मी प्राथमिकता देणार आहे." - कविता गायकवाड,एसटी संवर्गातून मुलींमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी

Advertisement
0