आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. तसेच या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेच्या लोगोचे उद्घाटन करण्यात आले. गरुड मैदानावर २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा आयोजन समितीची बैठक पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, शिक्षणाधिकारी मोहन देसले, अनुप अग्रवाल, उमेश चौधरी, सुनील चौधरी, कमलाकर अहिरराव, राष्ट्रीय खेळाडू महेश बोरसे आदी उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री महाजन पुढे म्हणाले की, स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हावासीयांना एक आनंदाची पर्वणी लाभणार आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या तातडीने गठीत करून कामांचे वाटप करण्याच्या सूचना केल्या. या स्पर्धा तीन पोडियममध्ये मॅटवर होणार आहेत. या स्पर्धेत ३१ लाख २० हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रेक्षकांसाठी गरुड मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांनी दिली. स्पर्धेच्या आयोजनासाठी महानगरपालिका, जिल्हा तालीम संघ तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभणार आहे.
१० वजनगटात ३० संघ सहभागी होणार
स्पर्धा फ्री स्टाइल, ग्रीको रोमन व मुलींचा संघ अशा प्रत्येकी दहा वजनगटात तीस संघ सहभागी होणार आहे. प्रत्येक संघात ७ खेळाडू, १ क्रीडा मार्गदर्शक व १ व्यवस्थापक असा एकूण ९ जणांचा समावेश राहील. या स्पर्धेत ३६० वरिष्ठ कुस्तीगीर, १०० पंच व पदाधिकारी तसेच ५० स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण ६५० जण सहभागी होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.