आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:‘काय मागू पंढरीनाथा, माझी चिंता तुज सर्व आहे’ अभंग गात ताजोद्दीन महाराजांनी वारकऱ्याच्या मांडीवरच ठेवला देह

निजामपूर / मनोहर राणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साक्री तालुक्यातील जामदे येथील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात कीर्तन करताना हृदयविकाराने निधन

हरिनामात दंग होत ‘काय मागू पंढरीनाथा, माझी चिंता तुज सर्व आहे’, या अभंगाचे गायन करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अचानक खाली बसून एका वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवत औरंगाबाद येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन शेख (महाराज) यांनी शेवटचा श्वास घेतला. साक्री तालुक्यातील जामदे येथील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात सोमवारी रात्री घटना घडल्याने वारकरी संप्रदायात शोककळा पसरली.

जामदे येथे गेल्या सात दिवसांपासून ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे. सोमवारी रात्री ९ वाजता औरंगाबाद येथील कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन शेख कीर्तन करीत होते. कीर्तनाचे निरूपण सुरू असतानाच त्यांना जोराची कळ आल्याने ते मंचावर खाली बसले. तेथेच बसलेल्या खोरी येथील भिलाजी बारीक शिंदे या वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवला. ते अचानक खाली बसल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आयोजकांनी त्यांना वाहनाने नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील डाॅक्टरांकडे नेले. तेथून नंदुरबार येथे हाॅस्पिटलमध्ये हलवले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना औरंगाबाद येथे नेण्यात आले.

नेहमी बंधुभाव जपण्याचा सल्ला
ताजोद्दीन महाराज मुस्लिम असूनही भगवे कपडे परिधान करून वारकरी संप्रदायात रममाण झाले होते. त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. मराठी वाङ‌्मय व संत साहित्यावर पीएचडी केली होती. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर कीर्तन करत होते. संतांच्या विविध अभंगांचे दाखले देत कीर्तनातून ते नेहमी बंधुभाव जपण्याचा सल्ला देत राहिले.

बालमित्रांमुळे लागली भजन-कीर्तनाची गोडी, शेवटच्या श्वासापर्यंत ओठी केवळ विठ्ठलाचे नाव
केशव महाराज आरगडे

अंबड | जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याच्या बाेधलापुरी येथील मूळ राहणारे व वारकरी संप्रदायासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या ताजोद्दीन शेख महाराज यांच्याबाबत अंबड येथील बालमित्र केशव महाराज आरगडे यांनी आठवणींना उजाळा दिला. तो त्यांच्याच शब्दांत....

सद्गुरूंच्या संगे शिष्य बि घडला,
शिष्य बि घडला सद्गुरुचि झाला...

संगतीतून माणूस कसा घडतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ताजोद्दीन शेख महाराज. जन्माने मुस्लिम असूनही आमच्यासोबत राहून ताजोद्दीन महाराज भजन, भारुड, कीर्तनात रमले. सातवीपर्यंत शिकल्यानंतर पुढे सर्व गोष्टींचा त्याग करून त्यांनी वारकरी संप्रदायासाठी स्वतःला वाहून घेतले. कीर्तन आणि भारुडात पारंगत असलेल्या ताजोद्दीन महाराजांनी उभी हयात राज्यभर फिरून प्रबोधनाचे कार्य केले. ताजोद्दीन शेख महाराजांचा जन्म घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावात एका सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबात झाला. शाळेत शिकत असताना आम्ही दररोज भजन, भारुडाला जात असू. आमचे पाहून ताजोद्दीन महाराज आमच्यासोबत यायला लागले. काही दिवसांतच भजन आणि भारुडात ते पारंगत झाले. पंचक्रोशीत जसे प्रसिद्ध होऊ लागले तसे त्यांना विरोध सुरू झाला. मुस्लिम असतानाही त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारणे अनेकांना रुचले नाही. परंतु, महाराजांनी आपले कार्य सुरू ठेवले. आपल्याला जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वधर्म समभाव मानणारा समाज तयार करायचा आहे, असे महाराज आम्हाला सांगायचे. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्यांदा कीर्तन केले ते आपल्या बोंधलापुरी गावातच. बोंधलापुरी गावात त्यांनी छोटासा मठ उभा केला. या ठिकाणी साईबाबांची मूर्ती त्यांनी स्थापन केली.

शेवटपर्यंत संघर्षमय जीवन : महाराजांनी काही काळ मुंबईत एका कारखान्यात काम केले. पण तेथे ते फार काळ रमले नाही. त्यांनी नोकरी सोडली. परंतु, पैसे नाहीत म्हणून ते थांबले नाहीत. त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे विचार काम अखंडपणे सुरू ठेवले. राज्यभर सतत कीर्तनाचे कार्यक्रम सुरू असायचे. (शब्दांकन : महेश कुलकर्णी)

बातम्या आणखी आहेत...