आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम:शहादा तालुक्यात मजुरांची टंचाई; उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती

शहादा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. मजूर मिळत नसल्याने शेतामध्ये पिकांच्या बरोबरीने गवतदेखील वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. वाढीव मजुरीमुळे सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या वाटेवर आहे. शेतकरी रोज मजुरांसाठी भटकंती करत असतात. यावर्षी पावसाळा चांगला आहे. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. असे असताना दुसऱ्या बाजूला मजूर मिळत नसल्याने पिकांना रासायनिक खत वेळेवर दिले जात नसल्याने उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतांमध्ये पिकांबरोबर गवत वाढले आहे.

नाइलाजाने शेतकऱ्याने निंदणी सोडून तसेच पीक काढण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे मजूर दुसऱ्या गावाहून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरून रोज रिक्षाने आणावे लागतात, अशी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. कापूस, मूग, ज्वारी, केळी, या पिकांबाबत कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. मजूर मिळत नसल्याने केळी या झाडांवरच पिवळे होतात. शेतीत मोठ्या प्रमाणात खर्च करून उत्पन्न मात्र कमी येत असल्याचे दिसून आलेले आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना यांत्रिक शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यासाठी परराज्यात जाणारे मजुरांचे स्थलांतर थांबवणे गरजेचे आहे. कापूस, पपई, ऊस, केळी, ही पिके लावण्यापेक्षा गहू व सोयाबीन ही पिके लावणे सोईस्कर आहे. बाहेरगावाहून मजुरांना रिक्षाने आणावे लागते. प्रत्येक मजुरास दोन,अडीचशे रुपये मजुरी व रिक्षा भाडे सातशे ते आठशे रुपये रोजचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो.

शेतकरी आर्थिक विवंचनेत
शेतीसाठी मजूर मिळत नाही. तर महागड्या मजुरीने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण होतात. शेतकऱ्यांसाठी शेतामधील वीजपुरवठा दिवसा सुरळीत ठेवावा. मजुरांअभावी मिरची पिकावर फवारणी वेळेवर होत नाही, असे येथील शेतकरी जगदीश पाटील व एकनाथ दत्तू पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...