आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आरोग्य सर्वेक्षणात शौचालय वापरात पिछाडी; अहवाल अमान्य, पुनर्सर्वेक्षण

अमोल पाटील |धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात धुळे जिल्हा शौचालयाचा वापर करण्यात राज्यात सर्वात मागे असल्याचे नमूद आहे. सन २०१९-२१ मधील हा अहवाल गेल्यावर्षी मार्चमध्ये प्रसिद्ध झाला. हा अहवाल जिल्ह्याच्या पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाने अमान्य केला. तसेच जुलैत या विभागाने रॅण्डमली सर्वेक्षण केले. त्यात शंभर टक्के नागरिक शौचालय वापरत असल्याचे आढळून आले आहे.

उघड्यावर शौचास बसल्याने आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे शासनाने शौचालय बांधण्यासह त्यांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना ते बांधण्यासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. त्यानंतरही ग्रामीण भागात शौचालय वापराविषयी उदासीनता आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यात ८८ टक्के नागरिक शौचालयाचा वापर करतात. त्यात मुंबई आणि मुंबई शहर शौचालय वापरात आघाडीवर आहे. या ठिकाणी ९९ टक्के नागरिक शौचालय वापरतात. दुसरीकडे राज्यात धुळे जिल्हा शौचालयाच्या वापरात पिछाडीवर आहे. जिल्ह्यात ६८ टक्के नागरिक शौचालय वापरतात.

त्यात शहरी भागात ९८ टक्के तर ग्रामीण भागात ५७.७ टक्के नागरीक शौचालयाचा वापर करत असल्याचे सर्वेक्षणात नमूद आहे. जिल्ह्याच्या तुलनेत नंदुरबारची स्थिती बरी आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाने हे सर्वेक्षण अमान्य केले आहे. शौचालय वापराचे प्रमाण यापेक्षा अधिक असल्याचा दावा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाने केला आहे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शंभर टक्के नागरिक शौचालय वापरत करत असल्याचे नमूद आहे.

६८४ कुटुंबांचे केले सर्वेक्षण
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाने स्वतंत्र सर्वेक्षण केले. त्यानुसार जिल्ह्यातील ६८४ कुटुंबांची भेट घेण्यात आली. त्यात २०५ एससी कुटुंब, १३७ एसटी तर ३४२ इतर कुुटुंबांचा समावेश होता. सर्व कुटुंब शौचालयाचा वापर करत असल्याचे आढळून आले. तसेच ६३५ कुटुंबांकडे दोन शौचालय असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. सर्वेक्षणात ग्रामीण भागात शौचालयाचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हा अहवाल जिल्हा परिषदेने राज्य शासनाला सादर केला आहे.

जिल्ह्यातील शौचालयांची स्थिती
जिल्ह्यात कुटुंबांची संख्या २ लाख ७८ हजार ४८ आहे. त्यापैकी २ लाख ७१ हजार ६११ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय आहे. तसेच ६ हजार ४३७ कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात.

शासनाला कळवली माहिती
जिल्हा यापूर्वीच हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात येते आहे. एनएफएचएसच्या अहवालानंतर स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करून शौचालय वापरणाऱ्या कुटुंबाची अचूक माहिती शासनाला कळवली आहे.-प्रदीप पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

बातम्या आणखी आहेत...