आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एसटीला लक्ष्मी पावली; राज्यात धुळे आघाडीवर

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे दोन वर्षे एसटी महामंडळाला दिवाळीत फटका बसला होता. पण यंदाच्या दिवाळीत एसटीला लक्ष्मी पावली असे म्हणावे लागेल. कारण महामंडळाच्या धुळे विभागाने विक्रमी ११ कोटी ५२ लाखांचे उत्पन्न फक्त ११ दिवसांत मिळवले आहे. कमाईत धुळे विभाग राज्यात आघाडीवर आहे. या काळात एसटीच्या चाकांनी २९ लाख किलोमीटर प्रवास केला. दिवाळीनिमित्त विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या. तसेच दहा टक्के भाडेवाढही केली होती.

दिवाळीत एसटी महामंडळाने २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान जादा गाड्या सोडल्या. तसेच ११ दिवसांसाठी १० टक्के भाडेवाढ केली होती. त्यानंतरही अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांपेक्षा एसटीला प्राधान्य दिले. त्यामुळे एसटी महामंडळाला सन २०१९च्या तुलनेत विक्रमी उत्पन्न मिळाले. राज्यातील सर्व विभागातून महामंडळाला २१८ कोटींचे उत्पन्न मिळाले. त्यात सर्वाधिक वाटा धुळे विभागाचा आहे. धुळे विभागाला दिवाळीच्या काळात ११ कोटी ५२ लाखांचे उत्पन्न मिळाले. धुळे विभाग उद्दिष्टपूर्तीत आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर जळगाव विभाग असून, या विभागाला ११ कोटी ३२ लाख आणि तिसऱ्या क्रमांकावरील कोल्हापूर विभागाला १० कोटी ६४ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

आगारनिहाय मिळालेले उत्पन्न
धुळे विभागांतर्गत धुळे जिल्ह्यातील पाच आणि नंदुरबार जिल्ह्यातील चार आगारांचा समावेश आहे. धुळे आगाराला सर्वाधिक २ कोटी २२ लाख, साक्री आगाराला १ कोटी २८ लाख, नंदुरबार आगाराला १ कोटी ६० लाख, शहादा आगाराला १ कोटी ५० लाख, शिरपूर आगाराला १ कोटी ५८ लाख, अक्कलकुवा आगाराला ६२ लाख, नवापूर आगाराला १ कोटी ८ लाख, दोंडाईचा आगाराला ८७ लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येता आहे.

२९ लाख किमीचा प्रवास
धुळे विभागातील बसने २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान २९ लाख ४० हजार किलोमीटर प्रवास केला. धुळे आगारातील बस ५ लाख ५४ हजार किमी, साक्री आगारातील बस ३ लाख ३५ हजार किमी, नंदुरबार आगारातील बस ४ लाख १३ हजार किमी, शहादा आगारातील बस ३ लाख ९४ हजार किमी, शिरपूर आगारातील बस ३ लाख ९२ हजार किमी, अक्कलकुवा आगारातील बस १ लाख ७२ हजार किमी, शिंदखेडा आगारातील बस १ लाख ८१ हजार, नवापूर आगारातील बस २ लाख ७७ हजार, दोंडाईचा आगाराच्या बस २ लाख २४ हजार किमी धावल्या.

उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न
नियमित वाहतूक, लांब पल्ल्याची वाहतूक, शटल सेवेसह जादा बस फेऱ्यांचे दिवाळीत नियोजन करण्यात आले. दिवाळीत भाडेवाढ करूनही प्रवाशांनी एसटीला पसंती दिली. धुळे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न मिळवले.- सौरव देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, धुळे

बातम्या आणखी आहेत...