आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्री:जिल्ह्यात युरियासोबत नॅनो युरियाची लिंकिंगने हाेते विक्री

तळोदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यासह जिल्हाभरात युरिया खरेदी करताना ‘लिंकिंग’मुळे गरज नसतानाही नॅनो युरियाची खरेदी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुळात नॅनो युरिया शेतातील पिकांवर फवारणीद्वारे वापरणे अत्यंत फायद्याचे असल्याचे सांगितले जाते; परंतु शेतकरी नॅनो युरिया खरेदी करणे पसंत करत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दुकानदार व शेतकऱ्यांत शाब्दिक चकमकही होताना दिसून येते.

एका कंपनीने १० ते १५ टन युरियासोबत नॅनो युरिया दुकानदाराच्या माथी मारला. आता दुकानदार हाच नॅनो युरिया शेतकऱ्यांना जबरदस्तीने लिंकिंग करून घेण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे दुकानदारांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा नॅनो युरिया या लिक्विड खतांवर विश्वास नसल्याने त्याबाबत जनजागृती व वापराची पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी कृषी विभागामार्फत अभियान राबवणे गरजेचे ठरत आहे.

साध्या युरिया सोबत नॅनो युरिया घ्यावे लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांची लूट होताना दिसून येत आहे. २६६ रुपयाला मिळणारा गोणीतील युरिया २८० ते ३०० रुपयांना मिळत आहे. प्रत्येक दुकानदार युरिया खतासोबत नॅनो युरियासाठी तगादा लावत असून, नॅनो युरिया घ्यायचा नसेल तर सोबत मिश्र खत व जास्तीची रक्कम देऊन युरिया घ्यावा लागेल, असे सांगून सर्रास लूट सुरू आहे. खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना दुकानदार उधारीने खत देत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उधार मिळणार असल्याने जे खत जसे व ज्या किमतीत मिळेल त्या किमतीत घेऊन पिकांना देत आहेत.
तक्रार आल्यास दुकानदारांवर कारवाई
ज्या शेतकऱ्यांना नॅनो युरियाची आवश्यकता नसेल अशा शेतकऱ्यांना दुकानदारांनी अडवणूक करू नये. तसेे आढळल्यास किंवा तक्रार आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई हाेेईल. आतापर्यंत शेतकऱ्यांकडून तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी द्याव्यात. -प्रदीप लाटे, कृषी विस्तार अधिकारी, नंदुरबार.

बनावट खतांची विक्री; कारवाईची गरज
तळोदा तालुक्यात गुजरात, मध्य प्रदेश राज्यासह महाराष्ट्रातील काही अन्य भागातून बनावट खते एजंटाच्या माध्यमातून विक्रीसाठी दाखल झाली आहेत. याबाबत कृषी विभागाकडे तोंडी तक्रारी झाल्या. त्यावर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर बारीक लक्ष देत कठोर कारवाई करण्याची गरज असताना अनास्था दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...