आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:290 बोगस डॉक्टरांची यादी; आठ महिन्यांत फक्त  5 जणांवर कारवाई

नीलेश भंडारी | धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाेगस डाॅक्टरांचे प्रमाण वाढले आहे. याविषयी वारंवार तक्रार होते. प्रशासनाकडे जिल्ह्यातील २९० बोगस डाॅक्टरांची यादी आहे. पण गेल्या आठ महिन्यांत केवळ पाच जणांवर गुन्हे दाखल झाले. प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने बोगस डॉक्टरांचे फावते. दुसरीकडे आरोग्य विभागाकडून चार वर्षांपासून कारवाई वाढल्याचा दावा होतो. कमी पैशात उपचार होत असल्याने रुग्ण बोगस डाॅक्टरांकडे आकर्षित हाेतात. बोगस डॉक्टर अपूर्ण माहितीच्या आधारावर उपचार करत असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होतो.

जिल्ह्यात काही जण वैद्यकीय शिक्षण न घेता व प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करता आहे. मोठ्या रुग्णालयात उपचार करणे गरिबांना परवडत नाही. त्यामुळे असे रुग्ण या डॉक्टरांकडे उपचार घेतात. दुसरीकडे बोगस डॉक्टर अपूर्ण माहितीच्या आधारावर रुग्णांना औषध देत असल्याने याविषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी जिल्हा व तालुकास्तरीय पुनर्विलाेकन समिती स्थापन झाली आहे. या समितीच्या बैठका वेळेत होत नाही. दुसरीकडे प्रशासनाकडून सन २०१८ पासून बाेगस डाॅक्टरांवर कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले. पण उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारीपासून आॅगस्टपर्यंत केवळ पाच बाेगस डाॅक्टरांवर कारवाई झाली आहे.

सर्वाधिक धुळे तालुक्यात
धुळे तालुक्यात सर्वाधिक ९३, साक्री तालुक्यात ८६, शिरपूर तालुक्यात ७० आणि शिंदखेडा ४१ असे एकूण २९० बाेगस डाॅक्टर असल्याची माहिती जिल्हा परिषद आराेग्य विभागाकडून देण्यात आली. याविषयीची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा एलसीबीच्या पाेलिस निरीक्षकांकडे पाठवण्यात आल्याचे आराेग्य विभागाने सांगितले.

समिती गठीत पण बैठकांचे काय?
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती आहे. पण या समितीच्या बैठका केव्हा हाेतात, बैठकीत काय चर्चा होते, समितीकडून कोणती कारवाई होते याची माहिती दिली जात नाही. बोगस डॉक्टर जिल्हा पुनर्विलाेकन समितीची यापूर्वी ७ जूनला बैठक झाली आहे. बैठक होऊनही तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदावरच
बाेगस डाॅक्टरांचे उच्चाटन करण्यासाठी त्यांची यादी जाहीर करून कारवाई करावी, असे आदेश जिल्हास्तरीय बाेगस डाॅक्टर पुनर्विलाेकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले होते. याविषयाकडे डाॅ. याेगेश सूर्यवंशी यांनीही लक्ष वेधले होते. पण अद्यापही बाेगस डाॅक्टरांची यादी प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

ठोस कारवाईची आवश्यकता
जिल्ह्यात बाेगस डाॅक्टरांची संख्या जास्त आहे. त्यात परप्रांतीय व इतरांचा समावेश आहे. अवधान येथे कारवाई झाली. तेथे अजून काही जण बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पण कारवाई हाेत नाही. कारवाई करताना पाेलिस प्रशासनाचेही सहकार्य असणे महत्त्वाचे आहे. -डाॅ.याेगेश सूर्यवंशी, समिती सदस्य.

बातम्या आणखी आहेत...