आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:शेतकऱ्यांना भारनियमनाचा शॉक; दोन ते चार तास मिळणाऱ्या विजेने पीक संकटातशेतकऱ्यांना भारनियमनाचा शॉक; दोन ते चार तास मिळणाऱ्या विजेने पीक संकटात

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समस्या सुटली नाही तर आंदोलनाचा इशारा, फीडरनिहाय होतेय लोडशेडिंग

शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण असताना तसे होत नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक महावितरण कंपनीतर्फे भारनियमन केले जाते. भारनियमन किती वेळ होईल याचा कालावधी निश्चित नाही. शेतीसाठी केवळ दोन ते चार तास वीज दिवसा किंवा रात्री मिळते. या वेळेत कृषीपंप चालवून शेतीचे पूर्ण क्षेत्र ओलिताखाली आणता येत नाही. दुसरीकडे उन्हाच्या तडाख्यामुळे पिके करपत आहे. त्यामुळे शेतीला किमान आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम पाटील यांनी दिला आहे.

राज्यात काही दिवसांपासून विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे तूट भरून काढण्यासाठी महावितरण कंपनीकडून आपत्कालीन भारनियमन केले जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात अनियमित भारनियमन होते आहे. शेतीसाठी होणाऱ्या वीज पुरवठ्यात कपात झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करण्याचे धोरण आहे. पण या धोरणास हरताळ फासला जातो आहे. शेतीसाठी पुरेशी वीज मिळत नसल्याने कृषीपंप केवळ दोन ते चार तास चालतात. अनेक शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची व्यवस्था आहे. मात्र, पिकांना पाणी देण्यासाठी कृषीपंप सुरू असणे आवश्यक आहे. केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्यामुळे पिकांची पाण्याची गरज पूर्ण होत नाही.

असे होत आहे भारनियमन
विजेची तूट भरून काढण्यासाठी भारनियमन होते आहे. ज्या भागात वीजचोरी, वीज गळती व थकबाकी अधिक आहे. त्या भागातील फीडरवर दिवसा भारनियमन होत आहे. त्यासाठी फीडरनिहाय ए ते जी ३ अशी वर्गवारी केली आहे. सद्य:स्थितीत जी १ ते जी ३ या ग्रुपमधील फीडरवरून भारनियमन सुरू आहे. तूट अधिक वाढल्यास पुढील टप्प्यात सी ते एफ या ग्रुपमधील फीडरवरून भारनियमन होईल.

तर आंदोलन करणार
कृषीपंपासाठी आठ तास वीज पुरवठा केला पाहिजे. कोरोना काळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता वीज पुरवठ्यात कपात करून शेतकऱ्यांपुढे शासनाने अडचणी निर्माण करू नये. शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या फीडरवरून भारनियमन करू नये. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करू. संग्राम पाटील, कृषी सभापती, जिल्हा परिषद, धुळे

शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा व्हावा
बभळाज | वीजपुरवठा सुरळीत करावा यासह विविध मागण्यांसाठी किसान सभा व लालबावटा शेतमजूर युनियनच्या येथील शाखेतर्फे येथील वीज उपकेंद्रातील सहायक अभियंता किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसांपासून शेतीसाठी केला जाणारा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने टरबूज, केळी, पपई, टोमॅटो आदी बागायती पिके पाण्याअभावी करपता आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतीसाठी अखंड बारा तास वीजपुरवठा करावा, विजेअभावी पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई द्यावी, बभळाज वीज उपकेंद्रातील संपर्क क्रमांक त्वरित सुरू करावा, तरडी, बभळाज, हिसाळे, तोंदे, महादेव दोंडवाडे, अनेरडॅम गावातील जीर्ण विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करावे, तरडी येथील शिवबारीपाडा व इतर आदिवासी वस्तीतील रहिवाशांना इलेक्ट्रिकल पोल व डीपी बसवून द्यावी, शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी डिमांड मागणी करताच त्वरित डिमांड मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी, शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष अॅड. संतोष पाटील, किसान सभेचे कांबळे, अर्जुन कोळी, शेतमजूर युनियनचे कॉ. कवरलाल कोळी, रवींद्र पाटील, तुळशीराम पाटील, शेतकरी विश्वास देवरे, नंदलाल राजपूत, प्रभूसिंग राजपूत, शेतमजूर शिवा पावरा, सुभाष पावरा आदी सहभागी झाले होते. या वेळी सहायक अभियंता पाटील यांनी शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न होतील असे आश्वासन दिले.