आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लम्पी लसीकरण पूर्ण; म्हशींच्या वाहतुकीस परवानगी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे प्रयत्न सुरू आहे. त्यानूसार गो वंशीय जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच लम्पीने मृत झालेल्या १४ जनावरांच्या मालकांना ३ लाख २० हजार रूपये मोबदला गुरुवारी देण्यात आला. लम्पीची बाधा गो वंशीय पशुधनाला होत असल्याने म्हशींच्या वाहतुकीस सशर्त अनुमती देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. मिलींद भंणगे यांनी दिली.

जिल्ह्यातील चारही तालुक्यात लम्पीची बाधा झालेले जनावर आढळून आले आहे. बाधित जनावरांची संख्या तेराशेवर गेली आहे. सद्य:स्थितीत सक्रिय बाधित जनावरांची संख्या ५०० आहे. तसेच ३५ जनावरांचा मृत्यू झाला असून उर्वरित जनावरे उपचारानंतर बरे झाले आहे. लम्पीला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार बाधित नसलेल्या ३ लाख ५२ हजार ५४४ गो वंशीय जनावरांचे लसीकरण झाले आहे. रोज उद््भव केंद्राचा आढावा घेऊन नवीन उद््भव केंद्राच्या ठिकाणी तातडीने सर्वेक्षण केले जाते आहे.

तसेच बाधित नसलेल्या जनावरांचे लसीकरण, विलगीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. लम्पीची लागण फक्त गो वंशीय जनावरांना होते आहे. ही स्थिती असली तरी सर्व प्रकाराच्या जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन आता म्हशींच्या वाहतुकीस सशर्त अनुमती देण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेऊन म्हशींची वाहतुक करता येणार आहे. बाधित क्षेत्रातील म्हशींचीही तपासणी करुन वाहतुक करता येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लंम्पीचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी गुरांचा बाजार भरवण्यास काही दिवसापूर्वी बंदी घातली आहे.

१४ शेतकऱ्यांना अनुदान
एनडीआरफ कायद्यानुसार मृत गायीसाठी ३० हजार, बैलासाठी २५ हजार, वासरासाठी १६ हजार रूपये अनुदान दिले जाते. आतापर्यंत ही रक्कम फक्त तीन जनावरांसाठी दिली जात होती. ही मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १४ शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव मंजुर झाले. त्यानूसार गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३ लाख २० हजार रूपये जमा करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...