आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बीजीकरण करण्याचा निर्णय:मोकाट श्वानांमुळे जीव मुठीत; रोज सरासरी पाच जणांना दंश

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. शहरात रोज सरासरी पाच ते दहा श्वान दंशाच्या घटना घडतात. चौकाचौकात श्वानांच्या टोळ्या बसलेल्या असतात. त्यामुळे रात्री-अपरात्री कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठेका दिला जाणार आहे. पण दीड ते दोन महिन्यापासून ही प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे.

शहरात माेकाट श्वानांचा त्रास वाढला अाहे. गल्लीबाेळात, मुख्य व उपरस्त्यावर मोकाट श्वान बसलेले असतात. शासकीय दूध डेअरी परिसरातील एकाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला होता. संबंधिताचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे मोकाट श्वानांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर श्वान बसलेले असतात. ते दुचाकी, चारचाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या मागे लागतात. श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक स्थायी समितीसह महासभेत वारंवार करतात. पण प्रत्येक वेेळा महापालिका प्रशासन मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी ठेका दिला जाणार असल्याचे सांगून वेळ मारून नेते. दुसरीकडे नागरिकांना रात्री-अपरात्री जीव मुठीत घेऊन घरी जावे लागते.

निर्बीजीकरण कधी करणार?
श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी श्वानांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. ठेकेदारच डाॅक्टर, कर्मचारी व डाॅगव्हॅन उपलब्ध करून देणार आहे. ठेकेदार नेमण्यासाठी निविदा काढली. पण दोनच निविदा प्राप्त झाल्याने आता फेरनिविदा काढली आहे. निविदा दाखल करण्याची शेवटची मुदत २२ जून आहे.

श्वानांची संख्या अंदाजे १५ हजारांवर
शहरात सन २०१० मध्ये दिल्लीतील एका संस्थेने माेकाट श्वानांचे सर्वेक्षण केले हाेते. त्या वेळी शहरात ३६ व्यक्तीमागे एक श्वान असल्याचे आढळले होते. सद्य:स्थितीत शहरात सुमारे १५ हजार मोकाट श्वान असण्याची शक्यता आहे. मोकाट श्वानांची अनेक वर्षांपासून गणना झालेली नाही.

डॉगव्हॅन खरेदी आता बारगळली
मोकाट श्वानांना पकडण्यासाठी मनपाने डॉगव्हॅन खरेदीचा प्रस्ताव केला आहे. या व्हॅनचा वापर करून शहरातील श्वान पकडून ते अन्यत्र सोडण्याची योजना होती. पण आता डॉगव्हॅन खरेदीचा विषय बारगळला आहे.

बातम्या आणखी आहेत...