आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. धुळे जिल्ह्यात कापूस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करून द्यावीत. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी करून घ्यावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात पालकमंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.,पालिका आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून बि-बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेत बि-बियाणे मिळेल. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६६९ मिलिमीटर आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४.१६ लाख हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जोशी यांनी प्रास्ताविक केले.
लघु कार्यकारी गटाची बैठक
नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या लघु कार्यकारी गटाची बैठक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी २३६ कोटी रुपयांचा आदिवासी उपयोजनासाठी ११८ कोटी, तर विशेष घटक योजनेसाठी ३० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. याशिवाय५० कोटी रुपयांचा आव्हान निधी उपलब्ध होवू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावेत. या निधीतून संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य, शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.