आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर हालचाली; प्रक्रिया गतिमान व्हावी

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून काही अंतरावरील अवधान एमआयडीसीत नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्लॉट शिल्लक नसल्याने रावेर येथे एमआयडीसीचा विस्तार होणार आहे. त्यासाठी ९८ हेक्टर जागा अधिग्रहित करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर लवकरच जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या भागातील वन विभागाची जमीन महसूल विभागाकडे वर्ग झाल्यावर पुढील प्रक्रिया होऊ शकते.

शहराजवळील अवधान येथे ३० ते ३५ वर्षांपूर्वी एमआयडीसी झाली. काही वर्षांपासून या ठिकाणी उद्योग वाढले. एमआयडीसीत फूड प्रोसेसिंग, ऑइल मिल, केमिकल आदी विविध लहान मोठे कारखाने आहे. या ठिकाणी आता नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्लाॅट शिल्लक नाही. त्यामुळे एमआयडीसीचा विस्तार करण्याची मागणी होते आहे. रावेर परिसरातील जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. ही जागा मिळावी यासाठी एमआयडीसी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला हाेता. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रावेर एमआयडीसी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा लवकरच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. बैठकीत जमीन अधिग्रहणातील अडचणींवर चर्चा होईल. याविषयीची माहिती शासनाला दिली जाईल. वन विभागाची जमिन महसूल विभागाकडे वर्ग झाल्यावर पुढील कार्यवाही होऊ शकते.

रावेर क्षेत्रात २९० हेक्टर जागा
अवधान एमआयडीपासून रावेर जवळ असल्याने ही जागा एमआयडीसीच्या विस्तारासाठी चांगली आहे. रावेर परिसरात २९० हेक्टर जागा उपलब्ध आहे. पण ही जागा वन विभागाच्या अखत्यारित आहे.

अवधान एमआयडीसीत ८३१ प्लॉट
अवधान एमआयडीसीत ८३१ प्लॉट असून ६१८ प्लॉटवर उद्योग सुरू असून, ४८ प्लॉटवरील उद्योग बंद आहे. तसेच ३४ प्लॉटवर बांधकाम सुरू आहे. ८४ प्लॉटवर अद्याप बांधकाम झालेले नाही. संबंधितांना पाच वर्षांच्या आता बांधकाम करावे लागेल. त्यानंतरही बांधकाम झाले नाही तर मग नोटीस दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...