आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पर्धा व धावपळीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातून हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. हृदयरोगाचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या महागड्या तपासण्या कराव्या लागतात. पण अनेकांना त्या करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेचा खासगी आरोग्य संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना माफक दरात हृदयरोगाशी निगडित तपासण्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. त्यात टू डी इको, स्ट्रेस टेस्टसह अन्य तपासण्यांचा समावेश असेल.
शहरात महापालिकेचे १२ दवाखाने आहेत. तसेच आता नव्याने काही भागात आरोग्यवर्धिनी केंद्रही सुरू झाले आहे. या दवाखान्यातून बाह्यरुग्ण सेवा दिली जाते. तसेच रुग्णांना विविध प्रकारची औषध मोफत दिली जातात. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. महापालिकेच्या दवाखान्यात अनेक सुविधांचा अभाव आहे. प्रसूती विभाग सोडला तर रुग्ण दाखलची सुविधा एकाही दवाखान्यात नाही. तसेच विविध प्रकारच्या तपासण्याही दवाखान्यात होत नाही.
त्यात हृदयरोगाशी संबंधित तपासण्यांचा समावेश आहे. या तपासण्या नागरिकांना खासगी दवाखान्यातून कराव्या लागतात. त्यासाठी येणारा आर्थिक खर्च अनेकांना परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने अत्याधुनिक कार्डिओलॉजी व हृदयरोग निदान विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव केला आहे. त्यासाठी महापालिका एका खासगी आरोग्य संस्थेच्या माध्यमातून ही सुविधा पुरवणार आहे. याविषयावर गुरुवारी होणाऱ्या महासभेत चर्चा होईल.
तीस वर्षांसाठी करार, साठे संकुलातील जागेचा प्रस्ताव
कार्डिओलॉजी व हृदयरोग निदान विभाग सुरू करण्यासाठी मॅग्नम संस्थेने महापालिकेकडे ९ हजार चौरस फूट जागा मागितली आहे. या ठिकाणी मनपाला मोफत वीज व पाण्याची सुविधा द्यावी लागेल. आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी महापालिका या संस्थेशी लेखी करार करेल. शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व्यापारी संकुलात हा विभाग सुरू करण्यासाठी जागा दिली जाऊ शकते. विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्राची खरेदी, दुरुस्तीसाठी लागणारा सर्व खर्च संबंधित संस्था करेल. या संस्थेसोबत तीस वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी आठ एमबीबीएस डॉक्टर
मनपाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून डॉक्टर, फर्निचर, औषधे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ८ एमबीबीएस डॉक्टर मनपाकडे वर्ग झाले आहेत. पण फर्निचर व औषधे उपलब्ध न झाल्याने आरोग्यवर्धिनी केंद्र अद्याप सुरू झाले नाही. आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेने विविध भागात जागा उपलब्ध करून दिली आहे. आत्तापर्यंत आठ डॉक्टर उपलब्ध झाले असून, त्यांनी अन्य दवाखान्यात काम सुरू केले आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी आणखी डॉक्टरांची आवश्यकता आहे.
कोणत्या तपासण्या होणार
महापालिका पुण्यातील मॅग्नम हेल्थ केअर सोल्युशनच्या माध्यमातून हृदयरोग तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागरिकांना टू डी इको, स्ट्रेस टेस्ट, होल्टर, टीईई, अॅम्ब्युलेटरी, बीपी माॅनिटरिंग आणि अत्याधुनिक कार्डिओलॉजी तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
केंद्रात खासगी रूग्णालयापेक्षा कमी शुल्क
या केंद्रात येणाऱ्या रूग्णांकडून केंद्र सरकारच्या आरोग्य योजना दरानुसार व हदय सेवांसाठी५ टक्के अतिरिक्त दराने शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. पण हे शुल्क बाजारभावापेक्षा कमी असेल. आगामी काळात या शुल्कात वार्षिक दहा टक्के वाढ केली जाऊ शकते असे प्रस्तावात नमूद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.