आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिमगूळ. शिंदखेडा तालुक्यातील ७ हजार ५०० लोकवस्तीच्या या गावात मार्च महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला. ३५ दिवसांत ८०० जणांना कोरोना झाला अन् ४० जणांचा बळी गेला. ग्रामस्थ हादरले. कोरोनाला हद्दपार करण्याचा गावकरी व प्रशासनाने चंग बांधला. चाचण्यांवर भर, सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द, गावबंदी, मास्कची सक्ती अन् लसीकरणावर भर या पंचसूत्रीचा अवलंब केला.
ग्रामस्थांच्या या एकजुटीपुढे कोरोनाने गुडघे टेकले. आज कोरोनाचा एकही रुग्ण या गावात नाही. कोरोनामुक्तीचा हा ‘निमगूळ पॅटर्न’ आता प्रसिद्ध झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कोरोनाने या गावात शिरकाव केला. हळहळू रुग्णसंख्या वाढत गेली. दररोज १० ते १५ रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र देशमुख यांनी गावात तातडीची बैठक घेतली. डॉ.वीरेंद्र बागल, डॉ.प्रवीण जैन, डॉ.सुभाष जैन, शिक्षक नंदलाल बागल यांनी गावकऱ्यांना सजगतेचा इशारा दिला कंटेनमेंट क्षेत्र निश्चित करत सर्वेक्षण सुरू केले. अँटिजन चाचण्यांची संख्या वाढवली. प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी गावाला भेट देत संपूर्ण गाव बंद करण्याचा निर्णय घेतला.
मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि निर्जंतुकीकरणाने घडवला बदल
गावात प्रत्येकाला मास्क सक्ती करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, दुकानांवर सहा फुटांचे अंतर ठेवले, रुग्णालयात ही गर्दी टाळण्यासाठी निर्बंध, फिरत्या वाहनाद्वारे प्रबोधन, घरोघरी सॅनिटायझेशन, फवारणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व चाचण्या वाढवल्या.
ग्रामस्थांची स्वयंशिस्त मोलाची
ग्रामस्थांच्या स्वयंशिस्तीने कोरोनाला या गावातून आपला गाशा गुंडाळावा लागला. २० एप्रिलनंतर रुग्णसंख्येत घट झाली. आता गावात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही. २५ दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. -बापू सोनवणे, सरपंच, निमगूळ
महिनाभर पाळला लॉकडाऊन
गावात १५ दिवसांचा लॉकडाऊन होता, लोकांनी तो महिनाभर पाळला. प्रशासनाचे प्रयत्न अन् लोकांच्या १०० % सहभागामुळे कोरोनाला हरवता आले. आजही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर लोक स्वतः तपासणीसाठी पुढे येत आहेत. डॉ. हितेंद्र देशमुख, वैद्यकीय अधिकारी, निमगूळ
मार्चपासून ना विवाह ना साखरपुडा : २० मार्च ते ८ एप्रिलदरम्यान गावात ४० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मार्चपासून आतापर्यंत सर्व विवाह सोहळे रद्द केले गेले. दशक्रिया विधीचा कार्यक्रमही साधेपणाने घेतला गेला. सार्वजनिक कार्यक्रम रद्द, गावबंदी, मास्कची सक्ती अन् लसीकरणावर भर देत गावकऱ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने कोरोनाला हरवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.