आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इज ऑफ लिव्हिंग उपक्रम:जुनी मालमत्ता खरेदी करतानाच आता वीज मीटरही होणार नावावर

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर तेथील वीज मीटर जुन्या मालकाच्या नावावरून नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी ग्राहकांना धावपळ करावी लागते. पण आता ही धावाधाव थांबणार आहे. कारण महावितरण कंपनीतर्फे इज् ऑफ लिव्हिंग योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जुने घर विकत घेतल्यावर पूर्वीचे वीज मीटर आपोआप नवीन घर मालकाच्या नावावर होणार आहे.

एखाद्या व्यक्तीने जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यावर त्याला मुद्रांक शुल्क भरून हे घर नावावर करावे लागते. तसेच घर किंवा दुकानाचे वीज कनेक्शन जुन्या मालकाच्या नावावरून नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी वीज कंपनीत स्वतंत्र अर्ज करावा लागतो. त्यासाठी महावितरण कंपनीत कागदपत्रे जमा करून ठरावीक शुल्क भरल्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात होती. वीज मीटर नावावर करण्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा असली तरी काम वेळेत होत नव्हते. नागरिकांना वारंवार महावितरणकडे पाठपुरावा करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महावितरण कंपनीने आता इज् ऑफ लिव्हिंग ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जुनी मालमत्ता खरेदी केल्यावर वीज मीटर आपोआप नावावर होणार आहे. त्यामुळे खरेदीदारांची धावाधाव बंद होईल.

महावितरणची चाचणी यशस्वी ही योजना राबवण्यापूर्वी महावितरणने चाचणी घेतली होती. ती यशस्वी झाल्याने आता ही योजना राज्यभर राबवण्यात येणार आहे. ग्राहकांना वीज कनेक्शन आपोआप बदलून मिळण्याच्या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले होते. आता हे काम पूर्ण झाला असून, नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येईल.

मुद्रांक शुल्क, नोंदणी विभागाला जोडली ऑनलाइन प्रणाली मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाला महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. घर, दुकान खरेदी झाल्यावर महावितरणला याबाबत मेसेज येईल. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठवला जाईल. तसेच शुल्क भरण्याचे सांगितले जाईल. हे शुल्क ऑनलाइन भरता येईल. शुल्क भरल्यानंतर विजेचे कनेक्शन नावावर होईल. तसेच पुढील महिन्याचे वीज बिल नवीन मालकाच्या नावाने पाठवले जाईल. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्सफर करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...