आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायतीतून मिळणारे विविध प्रकारचे दाखले नागरिकांना घरबसल्या मिळतील. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना कराचा भरणाही ऑनलाइन करता येईल. त्यासाठी शासनाने महा-ई-ग्राम सिटीझन कनेक्ट अॅप विकसित केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाची माहिती या अॅपवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ८८ हजार मालमत्तांची नोंदणी अॅपवर झाली असल्याचे सांगण्यात आले.
शासनाने पेपरलेस कारभारावर भर दिला आहे. त्यानूसार यापूर्वी जमिनीचा सातबारा, सिटी सर्व्हे उतारा ऑनलाइन झाला आहे. त्यानंतर आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणारे सर्व दाखले घरबसल्या मिळवता येतील. त्यासाठी महा-ई-ग्राम सिटीझन कनेक्ट अॅप विकसित झाले आहे. हे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे लागेल. अॅपवर ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, मालमत्ताधारकाने केलेला कराचा भरणा दिसेल. अॅपमुळे नागरिकांना त्यांच्या कामासाठी ग्रामसेवकाची प्रतीक्षा व सरपंचाच्या मिनतवाऱ्या कराव्या लागणार नाही. अॅपवर जिल्ह्यातील सर्व मालमत्तांची नोंदणी केली जाईल. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ लाख मालमत्ता असून आतापर्यंत ८८ हजार ८४७ मालमत्तांची माहिती अॅपवर अपलोड झाली आहे. उर्वरित माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, नागरिकांना दाखले घरपोहच मिळणार असल्याने त्यांचे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात होणारे हेलपाटे थांबतील. त्याचबरोबर वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
कोणते दाखले मिळणार घरबसल्या या अॅपमुळे नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, नमुना ८ असेसमेंट उतारा, विवाह नोंदणी दाखला मिळेल. तसेच घरपट्टी, पाणीपट्टीची माहिती मिळेल. तसेच कर भरता येतील.
अॅप डाऊनलोड करणारे साक्रीत जास्त जिल्ह्यातील १० हजार ८४६ नागरिकांनी अॅप हे डाऊनलोड केले आहे. त्यात सर्वाधिक ४ हजार ४३३ नागरिक शिंदखेडा तालुक्यातील आहे. तसेच साक्री तालुक्यात ३ हजार ५६२, धुळे तालुक्यात १ हजार ८६६ तर शिरपूर तालुक्यात ९८५ नागरिकांनी अॅप डाऊनलोड केले आहे.
अशी अवलंबा पद्धत प्ले स्टोअरमधून महा-ई-ग्राम सिटीझन कनेक्ट अॅप डाऊनलोड करा. अॅप ओपन करून त्यात नोंदणी करावी. नाव, लिंग, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आदी माहिती अपलोड करावी. त्यानंतर मिळालेल्या युजर पासवर्डद्वारे लॅगिन करावे. अॅपवर विविध प्रकारचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे.
ग्रामसेवकांचे होणार बुधवारी प्रशिक्षण महा-ई-ग्राम सिटीझन कनेक्ट अॅपवर मालमत्तांची माहिती अपलोड केली जाते आहे. अॅपची माहिती देण्यासाठी १४ डिसेंबरला जिल्ह्यातील ग्रामसेवक आणि संग्राम कक्षाच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण होणार आहे. अविनाश चकोर, जिल्हा व्यवस्थापक, आपले सरकार केंद्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.