आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी सन २०१८ नंतर समायोजन कॅम्प झाला नव्हता. त्यांनतर तीन वर्षांनी मंगळवारी समायोजन शिबिर झाले. या शिबिरात अतिरिक्त ठरलेल्या ४९ पैकी ४० शिक्षकांचे एकाच दिवशी समायोजन झाले. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व्हावे यासाठी शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील काही शाळेतील कनिष्ठ शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात आले. अतिरिक्त शिक्षकांचे ज्या शाळांमध्ये जागा रिक्त आहेत. त्या शाळांमध्ये समायोजन करणे आवश्यक होते. मात्र, सन २०१८ नंतर समायोजनासाठी कॅम्प झाला नाही. दुसरीकडे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे अशी मागणी सातत्याने होत होती. जिल्हा परिषदेच्या सभांमध्येही हा मुद्दा गाजत होता. त्यानंतर शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी मार्च महिन्यात शाळानिहाय अतिरिक्त शिक्षक आणि रिक्त जागांची माहिती मागवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शाळांमध्ये अतिरिक्त असलेल्या शिक्षकांच्या समायोजनासाठी शिबिर झाले. शिबिरात ४९ पैकी ४० शिक्षकांचे समायोजन झाले.
अशी झाली प्रक्रिया
समायोजनाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली. या वेळी शाळानिहाय रिक्त जागा स्क्रिनवर दाखवण्यात आल्या. आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांनी शाळेची निवड केल्यावर त्यांचे त्या शाळेत समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले. या वेळी उपशिक्षणाधिकारी महेंद्र जोशी, अधीक्षिका मीनाक्षी गिरी आदी उपस्थित होते.
अद्याप ९ शिक्षकांचा प्रश्न कायम
या शिबिरानंतरही ९ शिक्षकांचे समायोजन तांत्रिक अडचणीमुळे झाले नाही. काही शाळांनी रिक्त जागांची माहिती दिली नाही. शिक्षक ज्या शाळेतून अतिरिक्त ठरले त्याच शाळेत जागा रिक्त असताना संस्थाचालकांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे संबंधित शाळांना पुन्हा एक संधी देत रिक्त जागांची माहिती सादर करण्याची सूचना झाली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यावर नऊ शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.