आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दीडशे रुपये डझनाच्या वह्या दोनशेवर तर ५ रुपयांचा पेन मिळेल सात रुपयाला; दप्तरही २५० रुपयांपासून पुढेच

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन शैक्षणिक वर्षाला १३ जूनपासून प्रारंभ होणार असल्याने शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसेल. गेल्या वर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या वह्या आता २०० रुपयांवर गेल्या आहेत. तसेच पाच रुपयांना मिळणारा साधा पेन आता सात रुपयांना मिळेल.

यंदा पहिल्या दिवसापासून शाळा सुरू होतील. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. यंदा साहित्याच्या किमतीत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. वह्यांच्या किमती डझनमागे ६० ते १०० रुपयांनी वाढल्या आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या सर्वसाधारण प्रकारातील वह्या आता २०० रुपये डझनावर गेल्या आहे.

शैक्षणिक साहित्याचे दर
पेन १२ ते १५ रुपये, वॉटर बॅग ७० ते ३३० रुपये, कंपास पेटी ७५ ते २०० रुपये, टिफिन बॉक्स ५० ते २५० रुपये, रेनकोट २०० ते ५५० रुपये, स्कूल बॅग २५० रुपयांपासून पुढे, वह्या १५० ते ३०० रुपये डझन, पेपर रिम २२० रुपये.

शाळांच्या फी मध्येही वाढ : शाळा दोन वर्षे बंद होत्या. पण काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवत शुल्क वसूल केले. शासन आदेशामुळे मागील वर्षी शिक्षण शुल्कात १० ते १५ टक्के सवलत देण्यात आली. यंदा शिक्षण शुल्कात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.

पहिलीसाठी लागतील दीड हजार : सन २०१९ मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य एक हजार रुपयापर्यंत मिळत होते. यंदा त्यासाठी दीड हजार रुपये मोजावे लागतील. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

कागदाच्या किमती वाढल्या
कोरोनामुळे दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले आहे. वह्यांच्या किमती मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. दुसरीकडे पालक जुन्या दराप्रमाणे मागणी करतात.
सतीश खिवसरा, विक्रेता

बातम्या आणखी आहेत...