आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश न्यायालयाने जानेवारी २०२२ मध्ये दिले होते. त्यानंतर वर्षभर पाठपुरावा केल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्गम, आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील साक्री व शिरपूर तालुक्यातील पेसा क्षेत्रात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी शिक्षकांची हाेती. पण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाच्या ६ ऑगस्ट २००२ मधील निर्णयाचा चुकीचा अर्थ लावत १२ वर्ष सेवा झाल्यानंतर चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू असलेल्या शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू होत नाही असा निर्णय घेतला. तसेच वसुली सुरू केली.
या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्यातील १३९ शिक्षकांतर्फे रूपेश जैन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने जोपर्यंत शिक्षक पेसा क्षेत्रात कार्यरत आहे. तोपर्यंत त्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश दिले. तसेच वसूल केलेले वेतन आणि थकीत एकस्तर श्रेणीचे वेतन देण्याचे आदेश दिले. त्यानंतरही या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. दुसरीकडे शिक्षकांचा वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाचे मार्गदर्शन मागवले. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या १३९ शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच संबंधित शिक्षकांची वेतन निश्चिती करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.