आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणीची प्रक्रिया आहे. या करिता ३ फेब्रुवारी पर्यंतची मुदत होती. या मुदतीत जिल्ह्यात ८७ शाळांची नोंदणी झाली असून, एकूण ९६८ जागा निर्माण झाल्या आहेत. अद्याप बहुतांश शाळांची नोंदणी बाकी असल्याने शासनाने शाळा नोंदणीसाठी १० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आर्थिक दुर्बल, वंचित घटकातील तसेच दिव्यांग बालक, अनाथ बालक, एचआयव्ही प्रभावित बालक, विधवा, परितक्ता, घटस्फोटित महिलेचे अपत्य, एकल पालकत्व असलेल्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतात.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुळातच या वर्षी प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झालेली आहे. आता पहिल्या टप्प्यात २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत शाळांना नोंदणीसाठी मुदत दिली होती. या मुदतीपर्यंत जिल्ह्यात ८७ शाळांनी नोंदणी केली आहे. त्या शाळांमध्ये ९६८ जागा रिक्त उपलब्ध आहेत.
मागील वर्षी शाळांची संख्या विचारात घेता. या वर्षी किमान १०० शाळांची नोंदणी अपेक्षित आहे. तसेच रिक्त जागा देखील १ हजार ३०० वर राहणार आहेत. मात्र अद्यापपर्यंत शाळा नोंदणीला अल्प प्रतिसाद असल्याने शासनाने शाळा नाेंदणीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे आगामी सहा दिवसात अजून शाळा नोंदणी वाढून जागा देखील वाढणार आहेत.
पालकांना वेळापत्रकाची प्रतीक्षा
यावर्षी शाळा नोंदणीच विलंबाने सुरू झालेली आहे. सध्याशाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने आता पालकांना प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणीची प्रतीक्षा लागून आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीपर्यंत पालकांसाठीची नोंदणी सुरू झाली होती. त्यामुळे यंदा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पुन्हा शाळा नोंदणीला मुदतवाढ दिल्याने प्रत्यक्षात विद्यार्थी नोंदणी लांबणीवर पडणार आहे.
शाळा नोंदणी सक्तीची
आरटीई प्रवेशासाठी शाळांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे असलेल्या आरटीई प्रवेशासाठीच्या पहिल्या वर्गातील जागा, वर्गाप्रमाणे क्षमता शिक्षण विभागाला कळवायची असून, आरटीई प्रमाणपत्र देखील घ्यायचे आहे. असे न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करत मान्यता रद्द करण्यात येणार आहे. ज्या शाळा बंद आहेत किंवा ज्या शाळांनी अल्पसंख्याक म्हणून नोंदणी केली आहे. अशा शाळांची देखील माहिती शिक्षण विभागाकडून घेण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.