आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर आरोप:सफाईसाठी येतात निम्मेच कर्मचारी; हजेरीसाठी निरीक्षकांचीच हप्तेखोरी

धुळे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रत्येक भागात स्वच्छता कर्मचारी नियुक्त आहे पण प्रत्यक्षात निम्मेच कर्मचारी काम करताना दिसतात. कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी होत नाही. स्वच्छता निरीक्षक दरमहा सफाई कर्मचाऱ्यांकडून हप्ते घेऊन त्यांना कामात सवलत देतात. तसेच हजेरी परस्पर लावतात, असा गंभीर आरोप महापालिका स्थायी समितीच्या सभेत झाला. महापालिका सभागृहात गुरुवारी ही सभा झाली. सभापती शीतल नवले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. नगरसेवक संजय जाधव यांनी सफाई कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी का बंद केली असा प्रश्न उपस्थित केला. तसेच प्रभागात नियुक्त केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारीही कामावर येत नाही. किती कर्मचारी येतात याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

कर्मचाऱ्यांची हजेरी घेणारे स्वच्छता निरीक्षक महिन्याला २० ते २५ हजार रुपये हप्ते घेत कर्मचाऱ्यांची हजेरी लावतात असा आरोप त्यांनी केला. त्यावर कार्यालय अधीक्षक राजेंद्र माईनकर म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीसाठी सॉफ्टवेअर घेतले पण त्याचा उपयोग झाला नाही. सध्या स्वच्छता निरीक्षक हजेरी घेतात, असेही ते म्हणाले. सभापती शीतल नवले म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणे मनपातही सकाळी ११ वाजेपर्यंत कर्मचारी येत नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी. नगरसेवकांना त्यांच्या भागात नियुक्त सफाई कर्मचाऱ्यांची यादी द्यावी,अशी सूचना सभापती नवले यांनी केली.

गटारीचे काम दुसऱ्याच ठिकाणी
प्रभाग क्रमांक ७ मध्ये ८०० मीटर गटारीचे काम निविदेत नमूदप्रमाणे ज्या जागेवर करण्याची आवश्यकता होती त्या जागेवर न करता अन्यत्र केले. या कामाची मोजमाप पुस्तिकेत काय नोंद केली आहे याची माहिती द्यावी,अशी मागणी नगरसेवक हर्ष रेलन यांनी केली. गटारीचे काम याच प्रभागात इतर ठिकाणी केल्याची माहिती सभापती नवले यांनी दिली.

आमदारांचा निषेध केला जावा; कारण स्थगितीसाठी याचिका
किरण अहिरराव यांनी मोकाट कुत्र्यांची समस्या मांडली. मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ठेकेदार नियुक्त झाला असून, येत्या आठवड्यापासून शस्त्रक्रियांचे काम सुरू असल्याची माहिती सभापती नवले यांनी दिली. नगरसेवक नागसेन बोरसे म्हणाले की, देवपुरातील रस्त्यांसाठी शासनाने ३० कोटी दिले आहे. पण आमदार फारुख शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रस्ते कामाचा ठराव रद्द करून कामाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आमदार शाह यांच्या निषेधाचा ठरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

७५९ कर्मचारी, सकाळी साडेसहापासून काम
मनपा आरोग्य विभागात ७५९ सफाई कर्मचारी असून, २२० कंत्राटी आहे. जास्त लाबी, रुंदीचे रस्ते, दाट वसाहतीसह बाजारपेठेच्या भागानुसार प्रत्येक भागात सफाई कर्मचारी नियुक्त असतात. शहरात १९ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात सरासरी २० ते २५ सफाई कर्मचारी आहेत. तसेच नवीन गणवेशाचे वाटप केले आहे. सकाळी ६.३० ते दुपारी १२ या वेळेत सफाईचे काम होते.

राजीनामा देऊ का : प्रभागातील अगदी लहान समस्याही वारंवार तक्रार करूनही सुटत नाही. पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहे. तसेच रस्त्यावर खड्डे पडले असून, या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पण उपयोग झाला नाही. समस्या सुटत नसल्याने रोषाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, असे वाटते, अशी खंत नगरसेवक नरेश चौधरी यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...