आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन शैक्षणिक धोरणानुसार पीएमश्री स्कूल या योजनेची अंमलबजावणीची सूचना शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदेसह महापालिकेला दिली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड होईल. या योजनेंतर्गत महापालिकेच्या सात शाळांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड झाली असून, त्यातून दोन आदर्श शाळांची निवड होणार आहे.
अर्थसंकल्पात देशभरातील १५ हजारांहून अधिक शाळा आदर्श करण्याचा निर्णय २०२०मध्ये झाला होता. त्यासाठी पीएमश्री स्कूल योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक शाळेची ७ प्रकारांत ५९ प्रश्नांवर गुणवत्ता तपासली जाणार आहे. या योजनेसाठी शाळांची नोंदणी केली जाते आहे. प्रत्येक तालुक्यातून दोन शाळा आदर्श केल्या जातील. शहरी भागातील शाळांनी ७० तर ग्रामीणमधील शाळांनी ६० टक्के गुण मिळवल्यानंतर या शाळेचा प्रस्ताव शासनाकडे जाईल. त्यासाठी मनपाच्या सात शाळांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड झाली आहे. या शाळांचे मॅपिंग होणार असल्याची माहिती मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र सोनवणे यांनी दिली.
असे आहेत निवडीचे निकष
यूडाएस कोड, राज्य व जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा अधिक पटसंख्येत असणारी शाळा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय व इतर भौतिक सुविधा, शाळेची इमारत, प्रशिक्षित शिक्षकी आदी निकषांचा आदर्श शाळा निवड करताना विचार होणार आहे.
योजना राबवण्याचा उद्देश काय
शाळांमध्ये उत्कृष्ट भौतिक पायाभूत सुविधा आणि योग्य संसाधने उपलब्ध करून देणे, सर्वसमावेशक, समाजोपयोगी शिवाय समाजाप्रती योगदान देणारे विद्यार्थी घडवणे, माजी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेत विद्यमान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा योजनेचा उद्देश आहे.
गुणवत्तेत सुधारणा होईल
पीएमश्री ही केंद्र सरकारची योजना असल्याने शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. या योजनेत ग्रामीण भागातील शाळांचाही समावेश असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल. - राकेश साळुंखे, शिक्षणाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.