आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोळा विशेष:बैलजोड्या आमच्या कुटुंबातील सदस्य, त्यांच्या मेहनतीने प्रगती

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैलजोडीसह विठोबा माळी. - Divya Marathi
बैलजोडीसह विठोबा माळी.

काळ बदलतोय तशी शेतीही बदलतेय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात मनुष्याची जागा जसे यंत्र घेतेय तसेच शेती अन् मातीत राबण्यासाठी बैलांची जागा आता ट्रॅक्टर्स घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील बैलजोड्यांच्या दावणी दुर्लभ होत चालल्या आहेत. पण काही कुटुंबांचे बैलजोड्यांवर प्रेम कायम आहे. शेतकऱ्याच्या घराला बैलजोडीशिवाय घरपण नाही असे या कुटुंबांना वाटते.

शेती, शेतकरी व बैलजोडी हे समीकरण पूर्वापार आहे. पण यांत्रिकीकरणामुळे आता शेतीत मशागतीसह अन्य कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. त्यामुळे बैलजोडीचे पालन करणाऱ्यांची संख्या कमी होते आहे. काही शेतकरी कुटुंब बैलांचा आजही शेतीसाठी वापर करतात. कुटुंबातील सदस्य असल्यागत त्यांचे पालनपोषण करतात. गोधन हेच सर्वश्रेष्ठ धन असल्याचे ते मानतात. त्यांच्या मेहनतीनेच प्रगती होत असल्याचीही काही शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळेच काही कुटंुबांकडे आजही बैलजोड्यांची दावण कायम आहे.

स्वत:ची शेती नाही, ५५ वर्षांपासून बैलांचा सांभाळ
विठोबा माळी | कापडणे

येथील विठोबा माळी यांच्याकडे स्वत:ची एक गुंठाही शेतजमीन नाही. पण गेल्या ५५ वर्षांपासून ते बैलजोडीचा सांभाळ करतात. बैलांचे संगोपन करण्याचा लहानपणापासून असलेल्या छंदातून त्यांनी बैलजोडी सांभाळली आहे. ते रोज न चुकता आधी बैलजोडीला चारापाणी देतात मगच स्वतः जेवण करतात. येथील ८५ वर्षांचे विठोबा जयराम माळी बैलांवर जिवापाड प्रेम करतात. बैलजोडीची आवड व छंदामुळे निम्मे बटाईने दुसऱ्याच्या ३० एकर शेतीची ते मशागत करतात. घराची परिस्थिती बेताची असल्याने ते वयाच्या १६व्या वर्षापासून सालदारकी करत होते. ते ५५ वर्षांपासून बैलांचा सांभाळ करत आहे. आतापर्यंत त्यांनी १५ बैलजोड्या बदलल्या आहे. सद्य:स्थितीत माळी यांच्याकडे असलेली बैलजोडी एक लाखांची ठेलारी जोडी असून गेल्या तेरा वर्षांपासून ते बैलजोडीचा सांभाळ करीत आहेत. विठोबा माळी दिवसातून तीन ते चार वेळा बैलांना चारापाणी देतात. माळी यांच्याकडे गाव व परिसरातील शेतकरी बैल कसे घ्यावे याबाबत विचारणा करायला येत असतात.

बैलांशिवाय घराला घरपण नाही
काही वर्षांपासून नांगरटी, वखरणी व अन्य कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करण्यास प्राधान्य दिले जात असले तरी कोळपणीसह शेतीच्या इतर कामांसाठी बैलजोडीची आवश्यकता असतेच. गोंदूर येथील शेतकरी प्रवीण पाटील यांची २० बिघे शेती व दुग्ध व्यवसाय आहे. अनेक वर्षांपासून ते बैलजोडीही पाळतात. प्रवीण पाटील यांनी काही वर्षांपूर्वी सव्वा लाख रुपये खर्च करून खिलार बैलजोडी विकत घेतली. शेतकऱ्याच्या घराला बैलजोडी शिवाय घरपण नाही, असे ते मानतात.

बैलजोडीसोबत शांतीलाल राजपूत.
बैलजोडीसोबत शांतीलाल राजपूत.

अत्यल्पभूधारक कुटुंबातर्फे ४ बैलजोड्यांचे पालन
अविनाश पाटील | बभळाज

उत्पन्नाचे कमी होत असलेले प्रमाण आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर बैलजोडी पाळणे जिकिरीचे होत असताना येथील अत्यल्पभूधारक शेतकरी कुटुंब चार बैलजोड्यांचे पालनपोषण करत आहे.

येथील शांतीलाल चंद्रसिंग राजपूत यांचे पाच भावांचे एकत्र कुटुंब असून, शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे स्वतःची पावणेनऊ एकर जमीन आहे; परंतु ते इतर शेतकऱ्यांची सुमारे १३५ एकर शेतजमीन उक्ते बटाई, निम्मे बटाईने घेतात. राजपूत कुटुंबाला परिसरात डखारावाले किंवा गढीवाले कुटुंब म्हणून अोळखले जाते. या कुटुंबाकडे ४ बैलजोड्या आहेत. अगोदर राजपूत यांच्याकडे बैलजोड्यांची संख्या जास्त होती. मात्र, आता ऊस, केळी, पपई, हळद, टोमॅटो, काकडी, कारले, मिरची अशा नगदी फळ व भाजीपालावर्गीय पिकांची शेतकरी लागवड करतात. त्यामुळे बैलांचे काम कमी असते. बैलजोडीला पर्याय नाही, असे मत शांतीलाल राजपूत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...