आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा तास मुसळधार:आविष्कार कॉलनी, जनता सोसायटीत 27 तासांनंतर वीज; आज होणार पाणीपुरवठा

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे सव्वा तास तो बरसला. देवपुरातील काही रस्त्यांवर पाणी साचले. आविष्कार कॉलनी, मुस्लिम नगर, जनता सोसायटी, जामचा मळा परिसरात २७ तास उलटल्यानंतर रविवारी रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू झाला दरम्यान, शहरात शनिवारी ६८ मिलिमीटर पाऊस झाला.

शहरासह परिसरात शनिवारी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नकाणेरोड परिसरातील यशवंत विनय मंदिर शाळेच्या परिसरातील रस्त्यावर पाणी भरले. वाडीभोकर व वलवाडी परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली. तसेच आग्रा रोडवर दत्त मंदिर चौकातही पाणी साचले होते. एनसीसी भवन समोरील रस्ताही काही वेळ पाण्याखाली गेला होता. पावसामुळे देवपूर पोलिस ठाण्याच्या बाहेर सुमारे १०० मीटरपर्यंत पाणी साचले आहे.

१२ दिवसाने पारा घसरला
शहरात शनिवारी दीड तासात ६८.६ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचे आगमन होण्यापूर्वी तापमानाचा पारा ४० अंशांवर होता. पाऊस बरसल्याने तापमान १२ दिवसांनी ३८ अंशांवर आले. यापूर्वी ३० मे रोजी तापमान ३९ अंश सेल्सिअस होते.

या भागात वीजपुरवठा खंडित : ३० हजार नागरिकांनी गैरसोय, निदर्शने करत वेधले लक्ष
शहरात शनिवारी झालेल्या पावसाने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. आविष्कार कॉलनी, मुस्लिम नगर, जनता सोसायटी, जामचा मळा परिसरात २७ तास उलटल्यानंतर रविवारी रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू झाला. कारण वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडत नव्हता. या भागात सुमारे ३० हजार नागरिक राहतात. शहरात शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत शहरातील ९५ टक्के भागात वीजपुरवठा सुरू झाला होता. मात्र, वडजाई रोड परिसरातील आविष्कार कॉलनी, जनता सोसायटी, मुस्लिम नगर, जामचा मळा या भागात रविवारी रात्री वीजपुरवठा सुरळीत झाला.परिसरात पावसाळ्यापूर्वी धोकेदायक वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम झाले नाही. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरसेवक अमीन पटेल यांनी आंदोलन केले.

हनुमान टेकडी केंद्रातून आज पाणीपुरवठा
हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा शनिवारी खंडित झाल्याने पाणीपुरवठा उशिराने झाला होता. त्यानंतर रविवारी या केंद्राचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने सोमवारी कुमारनगर, अशोकनगर, सिमेंट जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार आहे. तसेच रविवारीही शहरात अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत होता. पण, सोमवारी पाणीपुरवठा नियमित होईल.

बातम्या आणखी आहेत...