आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा ते दिवसांनंतर पाणी:बाभळे केंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत; आज पाणीपुरवठा

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या बाभळे जलशुद्धीकरण केंद्रासह मालेगावरोड जलकुंभाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले होते. वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने या ठिकाणाहून शुक्रवारी नियमित पाणीपुरवठा होईल. दरम्यान, शहरात सहा ते सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो आहे.

शहरात उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते. विविध भागात आठ ते नऊ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारीनंतर प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. पण आता पुन्हा तांत्रिक कारणामुळे सहा ते सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. दुसरीकडे काही दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्याचा फटका जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभांना बसतो आहे. तापी योजनेचे बाभळे जलशुद्धीकरण केंद्र व मालेगाव जलकुंभचा वीजपुरवठा १५ जूनला खंडित झाला होता. त्यामुळे पाणीपुरवठा एक दिवस उशिराने झाला. आता वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने उद्या शुक्रवारी देवपूर, मोहाडी जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ, ऑक्सिडेशन पाॅड, बडगुजर टाकी, मायक्रो टॉवर जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

या भागात समस्या अधिक तीव्र
देवपूर परिसर, नकाणे रोड परिसरातील वसाहतीत सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो आहे. त्यातही देवपुरातील मोहंमदी नगर, लाला सरदार नगरात गढूळ पाणीपुरवठा होण्याची समस्या एक आठवड्यापासून कायम आहे. याविषयी तक्रार झाली पण समस्या सुटली नाही.

दूषित पाण्याचा धोका वाढला
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. पण अद्यापही शहरातील अन्य भागातील जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्या कायम आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होत असून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा होण्याचा धोका वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...