आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेत शनिवारी महापौर व स्थायी समिती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. दुपारी २ वाजेपर्यंत मुदतीत नगरसचिव कार्यालयात महापौर पदासाठी भाजप नगरसेविका प्रतिभा चौधरी, स्थायी समिती सभापतिपदी किरण कुलेवार, उपसभापती पदासाठी विमलबाई पाटील यांचेच अर्ज दाखल झाले.
विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने महापौर, सभापती यांची निवड बिनविरोध निश्चित झाली असून, आता केवळ निवडीची औपचारिकता राहिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील अडीच वर्षांसाठी महापौरपदी असलेले प्रदीप कर्पे यांनी मुदतीपूर्व पक्षादेशाने महापौर पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे महापौर पदासाठी नव्याने निवडणूक घेण्यात येत आहे. तर स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्याकरताही निवडणूक दिनांक ८ फेब्रुवारी घेण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दिनांक ३ व ४ फेब्रुवारी दोन दिवस होती. त्यात दिनांक ३ फेब्रुवारी पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केला नाही. तर दुसऱ्या दिवशी अंतिम मुदतीत दुपारी २ वाजेच्या आत अर्ज दाखल केले.
या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक सुनील सोनार, संजय जाधव, बन्सी जाधव, भाजप गटनेते वालीबेन मंडोरे, नगरसेविका सारिका अग्रवाल, किरण कुलेवार, भाजप महिला आघाडी पदाधिकारी महिला आदी उपस्थित होते. दरम्यान, दिनांक २ फेब्रुवारीपासून भाजपचे नगरसेवक सहलीला खोपोली येथे रवाना झाले आहे. उर्वरित नगरसेवक अजूनही खोपोली येथेच मुक्कामी आहे.
महिलांना संधीमुळे महापालिकेत महिलाराज
पालिकेत शनिवारी महापौर, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत भाजपच्या नगरसेविकांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोधच निवड निश्चित झाली आहे. पालिकेत ५ वर्षाच्या कार्यकाळात हे शेवटचे वर्ष असुन महापाैर, स्थायी समिती सभापती पदी महिलांना भाजपने संधी दिली आहे. त्यामुळे सर्वच मुख्य पदावर महिलाच पदाधिकारी असल्याने मनपात महिलाराज आले आहे. महिलांच्या हाती शहरातील विकासाची सुत्रे सोपवली आहे.
अर्ज दाखलनंतर केला जल्लोष
भाजपाच्या नगरसेविकांचा अर्ज मुदतीत दाखल झाल्यानंतर महापौर, स्थायी समिती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदाच्या उमेदवारांचा महापालिका आवारातच पुष्पगुच्छ देेऊन पदाधिकारी व नगरसेवकांनी सत्कार केला आहे. तर यावेळी फटाक्याची आतषबाजीही केली.
एकाच प्रभागामध्ये संधी
महापौर पदासाठी प्रतिभा चौधरी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. प्रतिभा चौधरी प्रभाग क्रमांक ४ मधून निवडून आल्या आहेत. याच प्रभागातून महिनाभरापूर्वी उपमहापौरपदी नागसेन बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका किरण कुलेवार यांचीही स्थायी समिती सभापतिपदी वर्णी लागत आहे. यापूर्वी याच प्रभागातील नगरसेवक सुनील बैसाणे हे सभापती झाले होते.
एमआयएमकडून घेतला होता अर्ज
महापालिकेत विरोधी पक्ष एमआयएम चे नगरसेवक सईद बेग यांनी महापौर पदासाठी नगरसचिव कार्यालयातून अर्ज घेतला. मात्र मुदतीअंतीही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. सत्ताधारीचे प्रयत्न ही निवडणूक बिनविरोध करण्याचे सुरु होते. त्यामुळे त्याचे नगरसेवक सतत लक्ष ठेवून होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.