आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईद:ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून विश्वशांतीची प्रार्थना; शुभेच्छा देण्यासाठी पोलिस अधीक्षकांसह मान्यवरांची उपस्थिती

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामी संस्कृतीचा महान व सर्वात मोठा सण रमजान ईदची (ईद-उल-फित्र) नमाज दोन वर्षांनंतर पांझरा नदी किनारी असलेल्या ईदगाह मैदानावर झाली. कोरोनाची लाट ओसरल्याने यावर्षी ईदची नमाज इदगाहवर झाली. नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देखील दिल्या. या वेळी पोलीस अधीक्षक देखील शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते.

रमजान ईद, बकरी ईद हे दोन प्रमुख सण मुस्लिम बांधवांचे सर्वात मोठे सण म्हणून ओळखले जातात. या सणांच्या दिवशी धार्मिक परंपरा व शिकवणीनुसार सामूदायिकरित्या खुल्या आकाशाखाली अर्थात ईदगाह मैदानावर नमाज पठण केले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे सर्वप्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्यात आले होते. त्याचबरोबर, धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आली होती.

यामुळे मुस्लिम धर्मियांना ईदची नमाज आपापल्या घरांमध्येच पठण करावी लागली होती. मात्र, आता कोरोनाची लाट ओसरल्याने यावर्षी ईदची नमाज पांझरा नदी किनारी असलेल्या इदगाह मैदानावर झाली. ईदच्या निमित्ताने भिन्न धर्मियांनी देखील ईदगाह मैदाना जवळ उपस्थित राहुन मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक धिरज महाजन, मोतीलाल निकम, कैलास दामोदर, संदीप पाटील, मुक्तार मन्सुरी उपस्थित होते.

ईदगाह मैदान गजबजले
दोन दिवसा पूर्वीच इदगाह मैदान परिसरात स्वच्छता देखील करण्यात आली. सामूहिक नमाज मोठ्या अवधीनंतर इदगाह मैदानावर झाल्याने ईदच्या निमित्ताने समाज बांधवांच्या उपस्थितीने ईदगाह मैदान गजबजलेले होते. ईदच्या मुख्य नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...