आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीची पार्श्वभूमी:पालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी, नागरिकांच्या सुख-दु:खाच्या प्रसंगी सहभाग; अल्पसंख्याक मतांवर डोळा

तळोदा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा तळोदा पालिकेची निवडणूक होणार असून प्रत्येक पक्ष उघड तर काही गोपनीय पद्धतीने त्यासाठी नियोजन करू लागले आहेत. विशेषत: लग्न समारंभ, वाढदिवस अगदी लहान मुलांचे वाढदिवस असो की दुःखद घटना, अशा प्रत्येक कार्यक्रमात राजकीय नेते आवर्जून हजेरी लावतात. नुकत्याच संपलेल्या रमजान महिन्यात इफ्तार पार्टींचेही यासाठीच आयाेजन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शुक्रवारी माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी भाजपकडून नगराध्यक्ष अजय परदेशी व शहर अध्यक्ष योगेश चाैधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तर काँग्रेसकडून माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी आयाेजित करण्यात आली.

शिवसेना वगळता सर्व प्रमुख तिन्ही पक्षांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. येथील पालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्याची पूर्वतयारी आतापासूनच सुरू करून अल्पसंख्याक मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करताना दिसत आहे.

श्री गणेश सोशल ग्रुपच्या माध्यमातूनही इफ्तार पार्टीचे आयोजन
तळोदा शहरात पूर्वी पोलिस ठाण्याव्यतिरिक्त श्री गणेश सोशल ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जायचे. दरम्यान एकदा मराठी पत्रकार संघाला देखील आयोजनाबाबत पोलिस प्रशासनाने संधी दिली होती.

सर्वांनीच संपर्क वाढवला
निवडणूक ज्या वर्षी नाही असे तीन-चार वर्षे राजकीय नेते शांत दिसतात. मात्र निवडणुका आल्या की, गणपती उत्सवात देणग्या तीन पट वाढतात व गुलाल देणारे स्वतः पुढे येतात. देणग्या, बक्षिसे देण्यास उत्सुक असतात. कार्यक्रम छोटा असो की मोठा, सुखाचा असो की दुःखाचा, मी व आम्ही आलो होतो हे दाखवण्यासाठी निवडणूक वर्षात आवर्जून हजेरी लावली जाते.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये दिसतेय उत्साहाचे वातावरण
शहरात काँग्रेस, भाजप या पक्षांमध्ये मुस्लिम समाजाचे काही पदाधिकारी आहेत. तर दोन्ही पक्षांत आजी-माजी नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन बांधणी सुरू असून मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी संघटनेच्या पदावर आहेत. १५-२० वर्षांपूर्वी काँग्रेसच्या हक्काच्या मतदारांसाठी यंदा निवडणुकीत तीन-चार पक्ष पर्याय असतील. त्यामुळे मुस्लिम मतदार आपल्याकडे कसा वळेल, याच्या प्रयत्नात हे पक्ष असतील. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून चुणूक दिसून आली. शहरात श्रीराम नवमी, हनुमान जयंतीनिमित्त झालेले असंख्य महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रम त्यापाठोपाठ इफ्तार पार्टींमुळे शहरात राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...