आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातोश्री ग्रामसमृद्धी योजना:शहादा तालुक्यात मंजूर 14 गावांमधील रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करा : डॉ.गावित

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विविध कामांच्या आढावा बैठकीत चर्चेनंतर अधिकाऱ्यांना सूचना

शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता असणे खूपच महत्त्वाचे असते. शेतीसाठी रस्ता नसेल तर शेतातील पिकांना योग्य वेळी बाजारात नेण्यास अडचण निर्माण होते. परिणामी बाजारभाव कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे तालुक्यातील १४ गावांना मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. त्यात मनरेगा, राज्य रोहयो याप्रमाणे खडीकरणासह पक्क्या रस्त्याचे प्रति किलोमीटर अंदाजपत्रक अंदाजे तयार करण्याचा सूचना आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी सर्व विभाग प्रमुखांना केल्या.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुधवारी विविध विकास कामांसंदर्भात आमदार गावित यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आशितोष मेढे, बांधकाम शाखा अभियंता एच.बी. भोई, ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता मयूर बिब्वे, माजी जि.प. सदस्य धनराज पाटील, पं.स. सदस्य सुदाम पाटील, वासुदेव पाटील, नारायण सामुद्रे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक रस्त्याच्या कामावर अकुशल-कुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० राखण्यासाठी राज्य रोहयोतून पूरक कुशल निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे प्रस्तावित दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी अंदाजपत्रके बनवण्यात येणार असल्याचेही गावित म्हणाले.

या योजनेंतर्गत अस्तित्वातील शेत पाणंद कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे अशी कामे घेता येतील. सर्व शेत पाणंद रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मापदंडाप्रमाणे बांधण्यात येतील. त्यात फक्त जागेच्या उपलब्धतेप्रमाणे रुंदीमध्ये फरक पडेल. मात्र रस्त्यांची उंची, खडीचा आकार, तिच्या परताची जाडी, रस्त्याच्या दोन्ही बाजूचे नाले, रस्त्यांच्या बाजूला वृक्ष लागवड, गुणवत्तेची चाचणी इत्यादी सर्व बाबी मानक मापदंडाच्या असतील. ग्रामपंचायतींनी रस्त्यांचा आराखडा ग्रामसभेच्या मंजुरीने ३१ मेपर्यंत तयार करून बीडीआेंकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

शेत-पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज : कुलकर्णी
राज्यात शेत-पाणंद रस्त्यांची गरज आहे. पावसाळ्यातील पिके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी केवळ रस्ता नसल्यामुळे अशी पिके पिकवण्याचा विचार शेतकरी करत नाहीत. विविध पिके घेण्यात मोठा अडथळा निर्माण होतो. आणि म्हणूनच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात माल वाहतुकीसह इतर कामांसाठी शेत-पाणंद रस्ते निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनी दिली.

यांत्रिकीकरणामुळे बारमाही शेत रस्त्यांची गरज : घोरपडे
शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीकामांसाठी यंत्राचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता असते. त्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...