आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आर्थिक माेबदल्याऐवजी टीडीआर वाढवून देण्याची तयारी ; प्रदीप कर्पेंच्या उपस्थितीत बैठक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाटा ते पाराेळा राेडवरील शेतकरी पुतळ्यापर्यंत रस्ता आणि हत्ती डोहाजवळ पांझरा नदीवर नवीन पुल होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधीतून ४२ काेटी मंजुर केले. या कामासाठी कृषी महाविद्यालयासह शेतकऱ्यांची जमीन संपादित होईल. पण, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक माेबदल्याएेवजी टीडीआर वाढवून देण्याची तयारी मनपाची आहे. दुसरीकडे कृषी महाविद्यालयाने जमिन देण्यास असमर्थता दर्शवली आहे. नाेटीस न देता, भूसंपादन झालेले नसताना रस्त्याचे काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

रस्ता कामाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी महापाैर प्रदीप कर्पे यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसेवक सुनील बैसाणे, शहर अभियंता कैलास शिंदे, नगरसेविका वंदना भामरे, नगररचना विभागाचे कमलेश सोनवणे आदी उपस्थित होते. रस्त्याच्या कामासाठी ३१ शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयाची १९ आर जमिनी संपादित होणार आहे. शेतकऱ्यांना याेग्य मोबदला मिळावा यावर बैठकीत चर्चा झाली. भूसंपादनाचा निधी देण्याची मनपाची आर्थिक स्थिती नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात टीडीआर वाढवून देण्याची तयारी दर्शवण्यात आली. पण शेतकऱ्यांनी टीडीआरचा लाभ तात्काळ हाेणार नसल्याने या पर्यायावर नापसंती व्यक्त केली. दुसरीकडे शेतकऱ्यांना पूर्वसूचना किंवा नोटीस न देता जमिनीचे मोजमाप सुरू आहे. एका ठिकाणी विहीर बुजवली आहे. उस, कापूस, गहू व मक्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी दाखवली. या वेळी एक पदाधिकारी व स्वीकृत नगरसेवकाने शेतकऱ्यांना कुटुंबासह आंदाेलन करण्याचा सल्ला दिला. या वेळी रस्त्याशी निगडीत विविध विषयावर चर्चा झाली.

शेतकऱ्यांचे नुकसान नाही पारोळा रोड ते हत्तीडाेह रस्त्यासाठी १९ कोटी ३२ लाख ७६ हजार रूपये मंजूर आहे. मनपा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या कामाची पाहणी केली जाईल, असे आश्वासन महापौर प्रदीप कर्पे यांनी दिले.

कचरा डेपाेही हटवावा शेतकऱ्यांनी वरखेडी रस्त्यावरील कचरा डेपो हटवावा, अशी मागणी केली. आयुक्त टेकाळे म्हणाले की, कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर दुर्गंधी येणार नाही असेही आयुक्त म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...