आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय गांधी योजनेंतर्गत येणाऱ्या विविध पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणारा वयाचा दाखला हा केवळ शहादा तालुक्यातील म्हसावद येथेच उपलब्ध न करून देता तो दाखला तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग आदी लाभार्थ्यांना मनस्ताप व आर्थिक भुर्दंड न होता त्यांचा वेळ व पैसा वाचेल, अशी मागणी काही सदस्यांनी नुकत्याच झालेल्या शहादा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उचलून धरली. त्या अनुषंगाचा ठराव करण्यात येऊन सर्वानुमते सभेत मंजूर करण्यात आला.
संजय गांधी योजनेंतर्गत ज्या ज्येष्ठ, विधवा, अपंग आदी लाभार्थ्यांना वयाचा दाखला आवश्यक असतो अशा लाभार्थ्यांना वयाचा दाखला मिळवण्यासाठी शासकीय स्तरावरून म्हसावद (ता.शहादा) येथील ग्रामीण रुग्णालयात सोय करण्यात आली आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस व एक वैद्यकीय अधिकारी निश्चित करण्यात आला आहे; परंतु बऱ्याचदा त्या दिवशी सुटीचा दिवस येऊन जातो किंवा संबंधित वैद्यकीय अधिकारी शासकीय वा खासगी अशा काही ना काही कारणास्तव रुग्णालयात उपस्थित राहत नाही.
अनेक लाभार्थ्यांना याबाबत कोणतीही पूर्वकल्पना मिळत नसल्याने तालुक्यातील कानाकोपऱ्यातून म्हसावद ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या लाभार्थ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा विषय मासिक सभेत पंचायत समिती सदस्यांनी उचलून धरला. त्यास सर्वानुमते मान्यता देऊन तत्काळ ठराव करून त्याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी डॉ.राघवेंद्र घोरपडे यांना देण्यात आले.
या वेळी सभापती बायजा भील, उपसभापती वैशाली पाटील, पं.स. सदस्या रोहिणी पवार,भानुमती ईशी,चंदन पानपाटील, संगीता पाटील, निमा पटले, कमलबाई ठाकरे, रमणबाई पवार, ललिता शेवाळे, रंगिलीबाई पावरा, सरला ठाकरे, ललिता बाविस्कर, रत्नाबाई पवार, अरुणा भील, सत्येन वळवी, गोपी पावरा, विजयसिंग पावरा, गणेश पाटील, किशोर पाटील, श्रीराम याईस, जयसिंग माळीच, प्रकाश पावरा, वीरसिंग ठाकरे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.