आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा रुग्णालयात 100 खाटा वाढवण्याचा प्रस्ताव; हिरे रुग्णालयावरील ताण कमी होण्यासह जवळ मिळेल सुविधा

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील साक्रीरोडवर असलेल्या जुन्या जिल्हा रुग्णालयात १०० खाटा वाढवण्याचा प्रस्ताव नाशिक विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांना सादर झाला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर हिरे रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत सन २०१६ पूर्वी हिरे रुग्णालयाचे सुमारे ५०० बेडचे सर्वाेपचार रुग्णालय होते. हे रुग्णालय चक्करबर्डी परिसरात मार्च २०१६ मध्ये स्थलांतरित झाले. त्यामुळे नागरिकांना चक्करबर्डी येथील रुग्णालयात जावे लागते. त्यातून नागरिकांची गैरसोय होते. हिरे रुग्णालय शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच गंभीर रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेईपर्यंत त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात नव्याने १०० खाटा मंजूर कराव्यात, अशी मागणी होत होती. त्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने १०० खाटा वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

सहा वर्षांपूर्वी रुग्णालयाचे झाले होते स्थलांतर
हिरे रुग्णालय जुन्या जिल्हा रुग्णालयातून मार्च २०१६ मध्ये स्थलांतरित झाल्यानंतर ही जागा रिकामी होती. त्यामुळे रुग्णालय पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर ३० ऑगस्ट २०१९ मध्ये या ठिकाणी १०० खाटांच्या रुग्णालय कार्यान्वित झाले. शिवाय इतर विभागही सुरू झाले.

या रुग्णसेवा मिळणे शक्य
डायिलिसिस, एमआरआय, अद्ययावत आयसीयू, कान-नाक शस्त्रक्रिया, कॅन्सर बाधितांवर उपचार, अस्थी व्यंगावर शस्त्रक्रिया आदी सुविधा नव्याने शंभर खाटा मंजूर झाल्या तर मिळतील.

रिकाम्या इमारतींचा वापर व्हावा
शहराला लागून तीन महामार्ग जातात. हिरे रुग्णालय शहरापासून लांब आहे. जिल्हा रुग्णालय मध्यवर्ती ठिकाणी असून इमारतीही रिकाम्या आहे. जवळच बसस्थानक व रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात या ठिकाणी नवीन सुविधा पुरवली जाऊ शकते, असे प्रस्तावात नमूद आहे.

कोरोना काळात रुग्णसेवा
कोरोना काळात या रुग्णालयात दोन वर्षांत सुमारे ३ हजार ८०० बाधितांवर उपचार झाले. त्यापैकी केवळ एकाचा मृत्यू झाला. या रुग्णालयामुळे हिरे रुग्णालयावरचा भार कमी होण्यास मदत झाली.

प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचारी नियुक्त होतील
जुन्या जिल्हा रुग्णालयात १०० खाटांचे श्रेणीवर्धन करावे असा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. शिवाय अनेक लोकप्रतिनिधींनी तशी मागणी केली होती. याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास नव्याने कर्मचारी नियुक्तीही होऊ शकते.
डॉ. संजय शिंदे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक

बातम्या आणखी आहेत...