आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • QR Code On Each House; After Scanning, The Tax Information Will Be Available, The Municipality Will Also Understand Whether The Hour Train Comes Daily Or Not| Marathi News

स्मार्ट सिटीकडे:प्रत्येक घरावर क्यूआर कोड; स्कॅन केल्यावर मिळणार कराची माहिती, घंटागाडी रोज येते की नाही तेही मनपाला समजणार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी कराची रक्कम विचारण्यासाठी, स्वच्छतेविषयी तक्रार करण्यासाठी थेट महापालिकेत जावे लागते. नागरिकांना या कामासाठी महापालिकेत येण्याची गरज भासू नये यासाठी आता प्रत्येक घरावर आरएफआयडी क्यूआर कोड लावण्यात येतो आहे. हा कोड मोबाइलमध्ये स्कॅन केल्यावर नागरिकांना घर बसल्या किती कर भरावा लागेल, किती कर थकला आहे यासह लसीकरणाची माहिती मिळेल. क्यूआर कोड बसवण्याचे काम खासगी कंपनीला दिले आहे.

महापालिकेच्या वसुली विभागात प्रत्येक मालमत्ताधारकाला किती कर द्यावा लागतो याची नोंद आहे. या व्यतिरिक्त मालमत्ता धारकाची अन्य माहिती या विभागात नाही. त्याचप्रमाणे मालमत्ता धारकांना त्यांच्या कराची व इतर सुविधांची माहिती एका क्षणात उपलब्ध होईल अशी सुविधा नाही. ही बाब लक्षात घेऊन शहरातील प्रत्येक घरावर आता आरएफआयडी क्यूआर कोड बसवण्यात येतो आहे. हा कोड मोबाइलमध्ये स्कॅन केल्यावर नागरिकांना मनपाशी संबंधित सेवा व कर मूल्यांकन, आरोग्य सुविधा, घंटागाडीची माहिती घरबसल्या मिळेल.

हा कोड आरएफआयडी अर्थात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन टॅग आहे. प्रत्येक कोडला स्वतंत्र क्रमांक असेल. तसेच मालमत्ता धारकांची संपूर्ण माहिती एका साॅफ्टवेअरमध्ये संकलित करण्यात येईल. त्यात मालमत्ताधारकाचे नाव, पत्ता, मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची मागणी, लसीकरण केले आहे का, परिसरात घंटागाडी नियमित येते का, कचरा वर्गीकरण होते का याची कोड स्कॅन केल्यावर मिळेल. हा कोड स्कॅन केल्यावर भविष्यात ऑनलाइन तक्रार करता येणार आहे.

कचऱ्याची होणार नोंद
प्रत्येक घराच्या दर्शनी भागावर हा कोड लावण्यात येणार आहे. घंटागाडी घरासमोर आल्यावर घंटागाडीतील उपकरण कोड आपोआप स्कॅन करेल. त्याचप्रमाणे ओला व काेरडा कचरा जमा करण्यासाठी दोन स्वतंत्र कचराकुंडी असतील. त्यावरही क्यूआर कोड लावण्यात येईल. हा कोड स्कॅन करून कचरा जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिक ओला व सुका कचरा वेगळा संकलित करतात की नाही हे समजणार आहे.

स्मार्ट सिटीसाठी उपयोगी
शहराचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी विविध प्रकारचे निकष पूर्ण करावे लागतात. त्यात मालमत्तांची जीपीएसद्वारे मोजमाप करणे, शहर हगणदारीमुक्त करणे, पाणीपुरवठ्याची सुविधा देणे, आरएफआयडी क्यूआर कोड सुविधेचा समावेश आहे. त्यामुळे कोड लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

६० हजार घरांवर कोड : मनपा क्षेत्रात ८० हजार मालमत्ताधारक आहे. त्या सर्व मालमत्तावर आरएफआयडी क्यूआर कोड लावण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत ६० हजार घरांना कोडचे कार्ड लावले आहे.

स्वतंत्र साॅफ्टवेअरचा विकास
एकीकडे क्यूआर कोड बसवण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे शहरातील मालमत्ताधारकांची सर्व माहिती संकलित केली जाते आहे. ही माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये नोंदवली जाणार आहे. त्यासाठी साॅफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे. या साॅफ्टवेअरमध्ये शहराचा सर्व डाटा असेल.

बातम्या आणखी आहेत...