आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरळीत वाहतूक:एप्रिलनंतर रेल्वेमार्ग ओलांडणे थांबणार; दूध डेअरीजवळ भुयारी मार्ग, वेळेची बचत

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे ते चाळीसगाव रेल्वेमार्ग काही ठिकाणी रस्त्याला छेदून गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेगेट असून रेल्वे येण्या-जाण्याच्या वेळेला ते बंद करावे लागते. या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी रेल्वेगेट आहे तेथे भुयारी मार्ग होतो आहे. त्यानुसार शहरात शासकीय दूध डेअरी, जुना मुंबई-आग्रा महामार्ग व मोहाडी उपनगर या तीन ठिकाणी भुयारी मार्ग आहे. मोहाडी उपनगरातील काम पूर्ण झाले आहे. शासकीय दूध डेअरीजवळ काम वेगात सुरू आहे. ते एप्रिलपर्यंत होणार आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग ओलांडण्याचा धोका टळेल.

धुळे ते चाळीसगाव मेमू दिवसातून तीन वेळा येते व जाते. रेल्वेमार्गावर शहरासह परिसरात तीन ठिकाणी रेल्वेगेट आहे. त्यात मोहाडी उपनगरजवळील काम पूर्ण झाले आहे. आता जुना-मुंबई आग्रा महामार्ग व दसरा मैदानाजवळील शासकीय दूध डेअरी जवळील गेटचे काम होणार आहे. जुन्या आग्रा रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक असते. या रस्त्यावरून अवजड चारचाकी वाहने शहरात येतात व बाहेर जातात.

पण दूध डेअरी परिसरात अवजड वाहनांची वाहतूक कमी असली तरी या भागात रहिवास क्षेत्र असल्याने रेल्वे क्रॉसिंगवर नागरिकांची वर्दळ जास्त असते. या पार्श्वभूमीवर शासकीय दूध डेअरीजवळ असलेल्या रेल्वेगेटच्या शेजारी भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे.

हा भुयारी मार्ग जमिनीपासून ३० फूट खोल असेल. काही दिवसांपासून स्लॅब टाकण्याची तयारी सुरू आहे. या मार्गावरून ट्रकसारखे मोठे वाहनही जाऊ शकते. या भुयारी मार्गाची रुंदी १० मीटर असेल. हा भुयारी मार्ग दूध डेअरीच्या मागे असलेल्या केदार सिटीच्या समोरून सुरू होतो. तो रेल्वे मार्गाच्या खालून पलीकडे असलेल्या रस्त्याला जोडला जाईल, अशी माहिती देण्यात आली.

रेल्वे मार्गावर १६ ठिकाणी क्रॉसिंग
१ धुळे ते चाळीसगाव रेल्वे मार्गावर ज्या ठिकाणी रेल्वेगेट आहे तेथे भुयारी मार्ग बांधण्यात येतील. रेल्वे मार्गावर १६ रेल्वेगेट असून त्यातील ८ रेल्वेगेट धुळे तालुक्याच्या हद्दीत आहे. त्यात शासकीय दूध डेअरी, जुना मुंबई-आग्रा महामार्ग, मोहाडी उपनगर, रानमळा, गरताड, बाेरविहीर,जुनवणे,शिरूड या रेल्वेेगेटचा समावेश आहे. तेथेही भुयारी मार्ग होणार आहे.

गेटमनरहित आहे संकल्पना
२ रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी गेटमन नेमण्यात आले आहे. भविष्यात देशभरात मानवरहित रेल्वेगेट संकल्पना राबवली जाणार आहे. ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वे क्रॉसिंगवर गेटमन दिसणार नाही, अशी माहिती देण्यात आली.

कोंडीत अडकण्याचा त्रास वाचेल
३ धुळे ते चाळीसगाव मेमू आल्यावर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी नागरिकांना दहा ते पंधरा मिनिटे थांबावे लागते. या काळात क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागते. रेल्वेगेेट उघडल्यावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मनस्ताप होतो. भुयारी मार्ग झाल्यावर हा मनस्ताप कमी होईल. हे काम काही दिवसांपासून वेगात सुरू आहे.

या भागाला होणार फायदा
मालेगावरोड क्रॉसिंग व स्टेशनसमोरील केदार सिटी व विमलनाथ नगरसमोर होणाऱ्या भुयारी मार्गामुळे मिल परिसर, दूध डेअरी, भाईजीनगर, सुदर्शन कॉलनी, चितोडरोड परिसरातील वसाहती, चक्करबर्डी भाग, साईदर्शन कॉलनी आदी भागातील शंभर ते दीडशे वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे. मोहाडी उपनगर परिसरातील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्याने हा बोगदा खुला झाला आहे.

जुने गेट बंद करण्याचा प्रस्ताव
शासकीय दूध डेअरीजवळ असलेले रेल्वेगेट रोज दिवसातून तीन वेळा रेल्वे येण्याच्या व जाण्याच्या वेळेला पाच ते दहा मिनिटे बंद करावे लागते. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना अडकून पडावे लागते. त्यामुळे वेळ वाया जातो. तसेच रेल्वे मार्ग ओलांडताना नेहमी काळजी घ्यावी लागते. भुयारी मार्ग झाल्यावर जुने गेट कायमचे बंद होईल. दुसऱ्या टप्प्यात आग्रा रोडवरील रेल्वे गेटजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...