आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्टांतून १ हजार ३०० वॉटरप्रूफ लिफाफ्यांद्वारे देश- विदेशात बहिणी भावांसाठी राख्या पाठवणार आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साधे लिफाफे भिजून राख्यांचे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ लिफाफ्यांना प्राधान्य दिले जाते आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोस्टाने राख्या पाठवण्याचे प्रमाण तोकडे होते. यंदा मात्र हे चित्र बदलले आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यासह विदेशात राखी पाठवण्यासाठी महिलांना पोस्टाचा आधार वाटतो. त्यामुळे महिला देशांत तर राख्या पाठवतात. त्याचबरोबर विदेशातील भावाला राखी पाठवण्यात महिला आघाडीवर आहेत. जिल्ह्यातून विदेशात यूएई, टोकियो, कॅनडा, कावासकी युनियन सिटी, सुसबोटी आदी शहरांत पोस्टाच्या लिफाफ्यातून राख्या पाठवण्यात आल्या आहेत. रक्षाबंधन सण जसजसा जवळ येतो आहे, तसतशी पोस्टातून विदेशात राख्या पाठवण्याच्या संदर्भात विचारणा होऊ लागली आहे.
देश-विदेशातील राखी पाठवण्याचे दर
पोस्टात मिळणाऱ्या वॉटरप्रूफ लिफाफ्याची किंमत १० रुपये आकारली जाते आहे. देशात या लिफाफ्यांतून राखी पाठवण्यासाठी राखी पॅक झाल्यावर २० ग्रॅमपर्यंत १० रुपयांचे तिकीट लावावे लागते. त्या पुढील प्रती २० ग्रॅमला ५ रुपये तिकीट खर्च येतो. तर विदेशात राखी स्पीडपोस्टातून पाठवण्यात येते. अंतरानुसार खर्चाची आकारणी केली जाते.
यंदा राख्यांसाठी कलात्मक लिफाफा
वॉटरप्रूफ लिफाफा कलात्मक डिझाइनद्वारे तयार केला आहे. लिफाफ्यावर ‘हॅपी रक्षाबंधन’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच या लिफाफ्यावर राखीचे चित्रही चितारण्यात आले आहे.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी १३०० लिफाफे आले.
- प्रतापराव सोनवणे, प्रवर अधीक्षक, धुळे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.