आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच खून, घरफोडी अन् दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पोलिस दलातील जॅक या एकमेव श्वानावर पोलिसांची मदार आहे. जॅक चार वर्षांनी निवृत्त होईल. त्याची जागा सांभाळण्यासाठी जय व प्रिन्स या दोन श्वानांची निवड झाली आहे. डॉबरमॅन प्रजातीतील हे श्वान २०३२ पर्यंत पोलिस दलात कार्यरत असतील.
चार वर्षांनंतर जॅक होणार आहे सेवानिवृत्त
पोलिस दलातील श्वान पथकात जॅक हा एकमेव आहे. तो तपासात तरबेज असून त्याचा जन्म १८ जानेवारी २०१६ मध्ये झाला होता. सहा वर्षांपासून पोलिस दलात सेवारत असून, त्याने पाच क्लिष्ट खून, चार घरफोडी अन् एक दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत केली आहे. चार वर्षांनंतर जॅक सेवानिवृत्त होईल.
उच्च प्रजातीच्या श्वानाची कॅनल क्लबला नोंद
पोलिसांनी जयला नाशिक तर प्रिन्सला पुणे येथून आणले आहे. त्यापूर्वी दोघा श्वानांचा ५ पिढ्यांमधील ब्लड लाइन अर्थात वंश तपासला. कॅनल क्लब ऑफ इंडिया या शासनमान्य संस्थेकडून त्यांची वंशावळ तपासण्यात आली. उच्च प्रजातीच्या प्रत्येक श्वानाची कॅनल क्लबला नोंद होते.
मासळीवरून दरोडेखोरांपर्यंत
क्लिष्ट-जटिल गुन्ह्याच्या तपासात जॅकने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साक्री तालुक्यातील एका हॉटेलमध्ये लुटीनंतर दरोडेखोरांनी सोबत नेलेली माशांची भाजी व इतर वस्तूंचा गंध दिल्यावर जॅकने सुमारे ३ किमीपर्यंत पोलिसांना नेले. लूटमार करणाऱ्यांनी सोबत नेलेल्या भाजीतील मासळीचे काटे व इतर वस्तू या ठिकाणी मिळाल्या होत्या. शिवाय याच ठिकाणी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोरांची छबी टिपली गेली होती. त्यामुळे दरोडेखोर काही दिवसातच पोलिसांच्या हाती लागले होते.
जय-प्रिन्स डॉबरमॅन प्रजातीचे
पोलिस दलाने जॅक प्रमाणेच तरबेज-तल्लख असलेल्या डॉबरमॅन प्रजातीमधील जय व प्रिन्स या दोन श्वानांची त्याच्या जागेवर काम करण्यासाठी निवड केली आहे. साडेसात महिने वय असलेल्या जय-प्रिन्सचे खडतर प्रशिक्षण सुरू झाले आहे. जॅकला किरण निकम, योगेश लोणे, गोरख मंगळे हे हाताळतात. जय श्वानाला आर. जे. जाधव, अतुल पाटील तर प्रिन्सला कैलास परदेशी, चंद्रशेखर माळी हे प्रशिक्षण देत आहे.
प्रोफाइल तपासल्यावर मिळतो ताबा
पोलिसांत कार्यरत श्वान पथकातील श्वान १० वर्षे सेवा देतात. त्यानंतर शासन नियमानुसार त्यांना निवृत्त केले जाते. त्यांचा पगार हा केवळ श्वानांच्या आहारावर खर्च होतो. सेवानिवृत्तीनंतर अनेक प्राणी संघटना, इच्छुक शासकीय कर्मचारी व नागरिक या श्वानांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवतात. पण प्रोफाइल तपासल्याशिवाय त्यांना श्वानाचा ताबा दिला जात नाही. निवृत्तीनंतरही श्वान पथक या श्वानांची काळजी घेत असतात.
रोज २५० ग्रॅम राॅयल कॅनल : सकाळी व सायंकाळी प्रत्येकी २५० ग्रॅम टॅब्लेट स्वरूपातील रॉयल कॅनल दिले जाते. मांस व सकस आहारचा त्यात समावेश असतो. याशिवाय दरमहा त्यांचे वजन तपासले जाते. तसेच नियमित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.