आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान टळले:पशुसंवर्धनाचा समर्पित निधी परत; 17 पशुचिकित्सालय निर्लेखनाला मंजुरी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी सभापतींनी केलेल्या प्रयत्नांना मिळाले यश

जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी पशुचिकित्सलयांचे निर्लेखन प्रस्तावांच्या मंजुरीची वाट न पाहता बांधकामासाठी असलेला दोन कोटी ५५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला होता. अधिकाऱ्यांनी समर्पित केलेला निधी परत मिळवण्यासह १७ पशुचिकित्सालयांच्या निर्लेखन प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यास कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांना यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने आदिवासी क्षेत्रातील ८५ लाख आणि सर्वसाधारण क्षेत्रातील एक कोटी ४० लाख असे दोन कोटी ५५ लाख रुपयांचा बांधकामाचा निधी, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेंद्र लंघे यांनी डिसेंबर महिन्यातच शासनाला समर्पित केला. एकीकडे निधीची कमतरता असल्यामुळे जिल्ह्यातील पशुचिकित्सालयांचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले. जेव्हा निधी प्राप्त झाला त्या वेळेस जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी बेफिकिरी केल्याने निधी परत गेला. यामुळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव देखील स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. दरम्यान निधी समर्पित करताना डॉ.लंघे यांनी पशुचिकित्सालयांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव नसल्याचे कारण पुढे केले होते. निधी परत गेल्यामुळे जिल्ह्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांनी वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा केला. मंत्रालयातील ग्रामविकास विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या जुन्या इमारतींच्या निर्लेखनाचे प्रस्ताव स्वत: अधीक्षक अभियंता विनोद भदाणे यांच्याकडे घेऊन गेले. अधीक्षक अभियंता भदाणे यांनी निर्लेखन प्रस्तावांच्या अनुषंगाने केलेल्या ऑडिटचा अहवाल सभापती पाटील यांनी स्वत: मंत्रालयात सादर केला. या सर्व पाठपुराव्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील जुन्या १७ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या निर्लेखनास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील पत्र १६ तारखेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

मंत्रालयातून निर्लेखन प्रस्ताव मंजूर
जिल्ह्याचे नुकसान करण्याच्या उद्देशाने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेंद्र लंघे यांनी निधी समर्पित केला. मात्र पाठपुरावा करून मंत्रालयातून निर्लेखन प्रस्ताव मंजूर करून आणले आहेत.त्यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे. संग्राम पाटील, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती,जिल्हा परिषद

या सतरा दवाखान्यांच्या निर्लेखनास मंजुरी
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना उंभरे, वार्सा, महिर, निजामपूर, धमाणे, ब्राम्हणे, झेंडेअंजन, वकवाड, शिरुड, नेर, विटाई, इंदवे, म्हसदी, घोडदे, पिंजारझाडी, तऱ्हाडी, सांगवी येथील पशुवैद्यकीय दवाखाने जीर्ण झाल्याने त्यांच्या निर्लेखनास मंजुरी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...