आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगरोड:जिल्हा रुग्णालय ते पोदार शाळेपर्यंत रिंगरोड करा; वाहतूक कोंडी दूर होईल

रणजित राजपूत | नंदुरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वाढते अतिक्रमण, घराच्या बाहेर बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या पायऱ्या, अरुंद रस्ते तसेच तीनच बाजूंनी झालेला शहराच्या विकासामुळे शहरात दररोज वाहतुकीच्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. धुळेरोड, कोकणी हिल जवळील चौक तसेच जगताप वाडीजवळील चौकात तर रस्ता ओलांडताना भीती वाटते. रस्त्याचा हा ताण कमी करण्यासाठी रिंगरोड तयार करणे हा एकमेव उपाय असून, लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती असेल तर हे काम सहज होऊ शकते.नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती १९९८ला झाली.

२४ वर्षांत या जिल्ह्यात प्रचंड बदल झाला. लोकसंख्या वाढली. अनेक छोटी छोटी गावे जोडली गेली. त्यामुळे वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. शहादा-नवापूर बायपास रोडवर तर नागरिकांना चालताना भीती वाटत असते. शहराचा विकास पूर्व, उत्तर व दक्षिण दिशेलाच झाला. उत्तरेकडे विकास खुंटला. त्यामुळे तीन दिशेला प्रचंड गर्दी तर एका दिशेला शुकशुकाट अशी परिस्थिती आहे. हा वाहतुकीचा ताण कमी करायचा असेल तर ज्येष्ठ अभियंता संजय देसले यांनी स्वत: अध्ययन करून नवा अर्ध रिंगरोडचा आराखडा तयार केला आहे. आधीचा अर्ध रिंगराेड जोडून हा पूर्ण रिंगरोड तयार झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे. तसेच प्रदूषण कमी होऊन वेळेची बचत होणार आहे.

असा असेल रिंगरोड
जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या मंदिराच्या बाजूने रस्ता तयार करून तो सरळ पालिकेच्या आवास योजनेच्या इमारतीच्या बाजूने काढत जिल्हा परिषदेच्या मागच्या बाजूच्या रोडला हा रस्ता तयार करायचा. हा रस्ता सरळ नवापूर रस्ता ओलांडून इमाम बादशाह टेकडीला फाेडून पुढे बिलाडी रस्ता ओलांडत धानोरा रोडला जोडायचा आहे. या ठिकाणी रेल्वेचा रूळ येईल. या ठिकाणी उड्डाण पूल बांधावा लागेल. उजव्या रस्त्यावर पाताळगंगेला ओलांडून पुढे पोदार शाळेच्या मागून हा रस्ता जोडावा, असा आराखडा अभियंता संजय देसले यांनी दिला.

असा होईल फायदा
धानोरा, नळवा रोडवरील वाहतूक बाहेरून आल्यास शहरातील वर्दळ नियंत्रणात येणार आहे. यापूर्वी अनेक रस्ते मंजूर झाले आहेत. हा रस्ता मंजूर झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा अंदाज देसले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

या ठिकाणी उभारावा सर्कल
जगतापवाडी व दुधाळे शिवाराला जोडणाऱ्या रस्त्याजवळ सर्कल बांधणे गरजेचे आहे. माळीवाडा भागाकडे वस्ती खुंटली आहे. सिंधी कॉलनी, धुळेरोड, जगतापवाडी, गांधीनगर या भागात कॉलन्या वसल्या. मात्र माळीवाड्यातून जाणाऱ्या मार्गाकडे कुठल्याच कॉलनी वसल्या नाहीत. शहराचा चौफेर विकास करायचा असेल तर निश्चितपणे लोकप्रतिनिधींनी शहरातील रिंगरोडसाठी लक्ष घालणे गरजेचेे आहे.

बातम्या आणखी आहेत...